छोट्या पडद्यावरील रात्रीस खेळ चाले ही मालिका सुरुवातीच्या काळात तुफान चालली. या मालिकेचे पहिले दोन पर्व विशेष लोकप्रिय ठरले. तुलनेने तिसऱ्या पर्वाला कमी प्रतिसाद मिळाला. मात्र, सध्या ही मालिका रंजक वळणावर आल्यामुळे तिची लोकप्रियता वाढताना दिसत आहे. अण्णा नाईकांनी केलेल्या पापांमुळे त्यांच्या पुढच्या पिढीला अनेक संकटांना सामोरं जावं लागत आहे. अनेक अतृप्त आत्मे त्यांच्या कुटुंबाला त्रास देताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या वाड्यालाही शाप भोगावे लागत आहेत. मात्र, आता हा वाडा शापमुक्त होणार आहे.
अण्णा नाईकांनी केलेल्या चुकीमुळे त्यांच्या पुढच्या अनेक पिढ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक शुभकार्यात अडथळे येणे, कुटुंबातील सदस्यांवर दु:खाचा डोंगर कोसळणं अशा घटना घडत आहेत. परंतु, आता आण्णांनी केलेली पापं धुण्याचा प्रयत्न त्यांची पत्नी इंदू करणार आहे.
इंदू म्हणजेच माई घराण्याच्या मूळ पुरुषावर आणि कुलदैवतेवर भार टाकून सगळ्या स़कटांशी शेवटपर्यंत लढते. आपल्या उध्वस्त झालेल्या घराण्याला शाप मुक्त होण्यासाठी उ:शाप मिळवते. एक अशिक्षित स्त्री सुद्धा आपला स्वाभिमान जपून, संपूर्ण घराला पुन्हा उभं करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगते आणि त्यात जिंकून दाखवते. त्यामुळे आता लवकरच नाईकांचा वाडा शापमुक्त होणार आहे.