छोट्या पडद्यावरील अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte). या मालिकेत आतापर्यंत अनेक रंजक वळणं आली आहेत. अनिरुद्धने अरुंधतीची फसवणूक केल्यानंतर तिच्यातील एका नव्या स्त्रीने जन्म घेतला. एक गृहिणी म्हणून कित्येक वर्ष वावरणाऱ्या अरुंधतीने तिच्यातील आत्मविश्वास, सकारात्मक दृष्टीकोन देशमुख कुटुंबासह संजनालाही दाखवून दिली. त्यामुळे या मालिकेतील अरुंधती या पात्राला विशेष प्रेम मिळत आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच या मालिकेत आशुतोषची एन्ट्री झाली आहे. त्याच्या येण्यामुळे या मालिकेचं सगळं चित्र पालटून गेलं आहे. इतकंच नाही तर आता तो लवकरच अरुंधतीवर असलेल्या त्याच्या प्रेमाची कबुलीही देणार आहे.
स्टार प्रवाहने अलिकडेच या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये आशुतोष आणि त्याची आई चर्चा करताना दिसणार आहेत. यात माझ्यानंतर तू आयुष्यभर एकटा कसा काय राहणार? असा प्रश्न आशुतोषची आई त्याला विचारते. याविषयी उत्तर देताना तो अरुंधतीविषयी त्याला वाटणारी फिलिंग्स सांगणार आहे.
"अरुंधती माझ्या मनात होती, असणार आहे आणि असेल हे मी कधीच अमान्य केलं नाहीये. कारण अरुंधती माझ्या आयुष्यातली पहिली मुलगी होती जी मला मनापासून आवडली होती. मी तेव्हा १९-२० वर्षांचा होता. त्या वयात प्रेम म्हणजे काय हे मला कळत नव्हतं. पण त्याही वयात अरुंधतीबाबत मनात कधी वेडावाकडा विचार आला नाही. तेव्हाही तिचा साधेपणा, सोज्वळपणा, तिचं सौम्य हसणं, गाणं सगळं काही आवडायचं", असं आशुतोष म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "तिच्याकडे पाहिलं की असं वाटायचं ती जर सोबत असेल ना तर मी खूप आनंदात असेन. म्हणजे आयुष्य शांत, सुंदर असेल. तिच्यामुळे आजूबाजूचं वातावरण शुद्ध असेल. तसं मला इतर कोणाबाबत कधी वाटलं नाही. कुतूहल वाटलं, आकर्षण वाटलं. पण, आयुष्यभराची साथ देईल असा विश्वास कोणाविषय़ी नाही वाटला."
दरम्यान, आशुतोषने आईजवळ मन मोकळं केल्यानंतर आयुष्यात लग्नाचा विचार कर असा सूचक सल्ला त्याला आई देते. त्यामुळे आता आशुतोष इतक्या वर्षानंतर अरुंधतीसमोर त्याच्या प्रेमाची कबुली देणार का? जर त्याने अरुंधतीसमोर भावना व्यक्त केल्या तर अरुंधती त्याला साथ देईल का? असे असंख्य प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडले आहेत. मात्र, या सगळ्या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना हळूहळू मालिका पुढे सरकल्यावरच मिळणार आहेत.