बहुचर्चित ठरलेल्या 'बिग बॉस मराठी ३'ला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. आतापर्यंत या पर्वात कलाविश्वातील अनेक ओळखीचे चेहरे सहभागी झाले आहेत. याच कलाकारांच्या यादीमध्ये आता भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांचीही एण्ट्री झाली आहे. 'मोडेन पण वाकणार नाही', असं म्हणत शोच्या सुरुवातीलाच तृप्ती देसाईंनी घरातील सर्व स्पर्धकांना इशारा दिला आहे. परंतु, कायम चर्चेत राहणाऱ्या तृप्ती देसाईंनी या शोमध्ये सहभाग का घेतला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तरही तृप्ती देसाई यांनी दिलं आहे.
'बिग बॉस'च्या ग्रँड प्रिमियरमध्ये महेश मांजरेकर यांनी तृप्ती देसाईंना 'बिग बॉस'मध्ये सहभागी होण्यामागचं खरं कारण विचारलं. त्यावर समाजात माझी जी प्रतिमा निर्माण झाली आहे. त्या प्रतिमेच्या पलिकडे जाऊन मी एक व्यक्ती म्हणून कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी सहभागी झाले अशा आशयाचं उत्तर त्यांनी दिलं आहे.
"टीव्हीवर, सोशल मीडियावर जनतेने कायम मला भांडण करताना, महिलांच्या हक्कासाठी लढतांना किंवा आंदोलनादरम्यान अटक होतानाच पाहिलं आहे. परंतु, मी भांडखोर आहे ही जी माझी प्रतिमा निर्माण झाली आहे. किंवा, जो गैरसमज निर्माण झाला आहे. तो बदलण्यासाठी मी या शोमध्ये सहभागी झाले आहे. टीव्हीवर दिसणाऱ्या स्वभावाप्रमाणेच माझी दुसरी बाजूही मला जनतेला दाखवायची आहे", असं तृप्ती देसाई म्हणाल्या.
Bigg Boss Marathi 3 : कोण आहे 'बिग बॉस'च्या घरातील पहिली स्पर्धक सोनाली पाटील?
दरम्यान, आतापर्यंत 'बिग बॉस मराठी ३' मध्ये सोनाली पाटील, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, गायत्री दातार, सुरेखा कुडची,आविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ यांसारख्या कलाकारांनी सहभाग घेतला आहे.