छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत राहणारा शो म्हणजे 'बिग बॉस मराठी'. यंदा या शोचं तिसरं पर्व पार पडणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता दाटली आहे. येत्या १९ सप्टेंबरपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे यंदाच्या पर्वात नेमक्या कोणत्या नवीन गोष्टी पाहायला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. त्यातच यंदाच्या पर्वामध्ये दरवर्षीप्रमाणे विकेंडचा डाव रंगणार नसल्याची चर्चा सुरु झाली आहे.
बिग बॉस मराठीच्या प्रत्येक पर्वामधील लक्षात राहिलेला दिवस म्हणजे विकेंडचा डाव. या डावात सूत्रसंचालक महेश मांजरेकर कायमच घरातील स्पर्धकांची शाळा घेताना दिसतात. थोडक्यात, स्पर्धकांचं चुकल्यावर त्यांची कानउघडणी करतात आणि एखाद्या स्पर्धकाने काही चांगलं केलं तर त्याचं कौतुकही करतात. मात्र, यावेळी हा विकेंडचा डाव नसल्याचं समोर येत आहे.
यंदाच्या पर्वात 'विकेंडचा डाव'ऐवजी 'बिग बॉसची चावडी' हा भाग रंगणार आहे. विशेष म्हणजे शनिवार-रविवारच्या भागात होणाऱ्या या डावाला केवळ बिग बॉसची चावडी हे नवीन नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे 'विकेंडचा डाव' आता 'बिग बॉसची चावडी' या नवीन नावाने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, दरवेळेप्रमाणे यंदाच्या भागाचं सूत्रसंचालनदेखील अभिनेता महेश मांजरेकर करणार आहेत. मात्र, या पर्वात नेमके कोणते कलाकार झळकणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे या शोविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.