छोट्या पडद्यावरील वादग्रस्त ठरत असलेल्या बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) तिसऱ्या पर्वात स्नेहा वाघ हिची नुकतीच एक्झिट झाली आहे. २१ तारखेला रंगलेली 'बिग बॉसची चावडी' स्नेहा वाघसाठी (sneha wagh) शेवटची ठरली. प्रत्यक्षात पाहायला गेलं तर प्रेक्षकांच्या मतांमुळे या घरातील स्पर्धक सेफ झोनमध्ये असतात. जर प्रेक्षकांना एखाद्या स्पर्धकाचा खेळ आवडला नाही तर ते त्या स्पर्धकाला घरातून बाहेर काढू शकतात. असंच काहीसं स्नेहाच्या बाबतीत झालं आहे. स्नेहा घरातून बाहेर पडली आहे. मात्र, जनमतामुळे नाही तर घरातील एका व्यक्तीमुळे स्नेहाला बाहेर पडावं लागलं असं मत विकास आणि विशालचं आहे.
आज बिग बॉसच्या घरात विकास आणि विशाल स्नेहाच्या घराबाहेर जाण्याविषयी चर्चा करणार आहेत. यात जयमुळे स्नेहाला नॉमिनेट व्हावं लागलं आणि त्याच्यामुळेच ती घराबाहेर गेली असं मत या दोघांचं आहे.
"मला वाटलं होतं जय खूपच हर्ट होईल. बेस्ट बॉन्ड बनून वगैरे होते मी बघितलं. म्हणजे स्नेहाकडून तरी तसं दिसत होतं. स्नेहा कितीतरी वेळा माझ्याशी जयविषयी बोलली आहे. मुख्यत: नॉमिनेशन झाल्यापासून, की जयला किती वाईट वाटेल त्यांच्या कॅप्टन्सीसाठी मी झाले . अणि, त्यांच्यामुळे घरी जाणार... समजा मी गेलेच तर. त्या जेवढा विचार करत होत्या ना, कशी हालत होईल जयची आणि सगळं... जाताना पण त्यांनी मला खुणावलं सांभाळा त्यांना अशा पध्दतीने. कशाला सांभाळा आणि सगळं?", असं विशाल म्हणाला.
विशालचं ऐकल्यावर विकास म्हणतो, "नाही ही गोष्ट माझ्यापण लक्षात नव्हती की, ती नॉमिनेट त्याच्यासाठी झाली होती. आणि, आता तो कुठेतरी कारणीभूत ठरला ती बाहेर जाण्यासाठी..."
दरम्यान, आता या दोघांची चर्चा घरातील अन्य स्पर्धकांपर्यंत पोहोचणार का? जयमुळे स्नेहाला घरातून बाहेर पडावं लागल्यामुळे जयला या गोष्टीचा पश्चाताप होईल का? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या भागात प्रेक्षकांना मिळणार आहेत.