गेल्या १५ वर्षांपासून अवितरतपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे होम मिनिस्टर. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम स्त्रियांचा सन्मान, सत्कार करण्यात येतो. त्यामुळे या कार्यक्रमाचा मोठा प्रेक्षकवर्ग हा महिला असल्याचं पाहायला मिळतं. अभिनेता आदेश बांदेकर गेल्या कित्येक वर्षांपासून या कार्यक्रमाची धुरा सांभाळत असून आज ते महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे आता या कार्यक्रमात एक बदल करण्यात आला आहे.
आतापर्यंत या कार्यक्रमात विजयी ठरलेल्या 'होम मिनिस्टर'चा पैठणी देऊन सन्मान केला जायचा. मात्र, आता या सन्मान सोहळ्यात किंचितसा बदल करण्यात आला आहे. यात विजयी महिलेला चक्क ११ लाखांची पैठणी मिळणार आहे.
फक्त ५० रुपयांत 'या' लोकप्रिय अभिनेत्याने केलं लग्न; स्ट्रगल काळातील भन्नाट लव्हस्टोरी
सगळ्यांचे लाडके भावजी आदेश बांदेकर यांनी 'होम मिनिस्टर' निवडण्यासाठी फक्त महाराष्ट्रच नाही तर देशभ्रमंती केली आणि गेल्या अनेक वर्षांपासून देशातील कानाकोपऱ्यातून महिलांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला आहे. त्यामुळेच लवकरच या कार्यक्रमाचे एक विशेष पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पर्वाच नाव 'महामिनिस्टर' असं आहे.
या पर्वात महामिनिस्टरच्या शोधात आदेश भाऊजी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात पैठणीचा खेळ खेळणार आहे. विजेत्या वहिनींना मिळेल महामिनिस्टरचा खिताब आणि ११ लाखांची सोन्याची जरी असलेली पैठणी असं बक्षीस मिळणार आहे. त्यामुळे ११ लाखाच्या या महापैठणीसाठी चुरस रंगताना दिसेल. त्यामुळे सर्व वहिनी या नवीन पर्वासाठी आणि महामिनिस्टरचा खिताब जिंकण्यासाठी उत्सुक असल्याचं पाहायला मिळतं. या नव्या महामिनिस्टरच्या पर्वाची सुरुवात ११ एप्रिलापासून सुरु होणार आहे. त्यामुळे यावेळी महामिनिस्टर कोण ठरणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे.