Join us  

किचन कल्लाकारमध्ये मोठा बदल; 'ही' प्रसिद्ध युट्यूबर होणार आता राज शेफ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2022 6:30 PM

Kitchen kallakar: राज शेफ प्रत्येक स्पर्धकाला आणि प्रेक्षकांना पदार्थ करतांना काही महत्त्वाच्या टीप्स देताना दिसत आहे. परंतु, या कार्यक्रमात आता लहानसा बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वीच छोट्या पडद्यावर 'मस्त मजेदार किचन कल्लाकार' ( Kitchen Kallakar) हा नवा कुकरी शो सुरु झाला आहे. या कार्यक्रमात अभिनेता प्रशांत दामले (Prashant Damle)परिक्षकाच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे. तर अभिनेता संकर्षण क-हाडे सूत्रसंचालकाची भूमिका बजावत आहे. या दोन दिग्गजांसोबतच या कार्यक्रमात राज शेफदेखील महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. हे राज शेफ प्रत्येक स्पर्धकाला आणि प्रेक्षकांना पदार्थ करतांना काही महत्त्वाच्या टीप्स देताना दिसत आहे. परंतु, या कार्यक्रमात आता लहानसा बदल करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

हा शो सुरु झाल्यापासून जयंती काठळे या राज शेफ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. तसंच वेळोवेळी त्या स्पर्धकांना मार्गदर्शनही करत आहेत. परंतु, आता त्यांच्यासोबतच या कार्यक्रमात प्रसिद्ध युट्यूबर मधुरा बाचल झळकणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मधुरा बाचल यांचं मधुराज रेसिपी नावाचां लोकप्रिय युट्यूब चॅनेल आहे.

अलिकडेच मधुरा बाचल (madhura bachal) यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्या किचन कल्लाकारच्या सेटवर दिसून येत आहेत. "नवीन वर्षाच्या सर्वांना खमंग, खुसखुशीत नी गोडच गोड शुभेच्छा. नवीन वर्षात काहीतरी नवीन ! सर्व पक्षांनी एकत्र येऊन नि:पक्षपणे काय काय बनवले आणि धमाल केली बघायला विसरू नका किचन कल्लाकारमध्ये. दर बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 9.30 वाजता आपल्या लाडक्या वाहिनीवर", अशी पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.

कोण आहे मधुरा बाचल?

मधुरा बाचल यांचं स्वत:चं मधुराज रेसिपी या नावाचं युट्यूब चॅनेल आहे. या चॅनेलच्या माध्यमातून त्या भारतीय पदार्थांसह पाश्चात पदार्थ नेटकऱ्यांसोबत शेअर करत असतात. सध्याच्या घडीला लोकप्रिय युट्यूबरमध्ये त्यांचं आवर्जुन नाव घेतलं जातं. युट्यूबवर त्यांचे जवळपास ५८.८ लाखांहून अधिक सबस्क्रायबर असल्याचं पाहायला मिळतं. इतकंच नाही तर त्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही माध्यमातून त्या आपल्या फॉलोअर्सशी संवाद साधत असतात. त्यामुळे केवळ महाराष्ट्र आणि भारतच नव्हे तर विदेशातही त्यांच्या व्हिडीओजला पसंती मिळते.  रेसिपी शिवाय त्यांच्या ब्रँडचे मसालेदेखील बाजारात उपलब्ध आहेत. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारप्रशांत दामले