छोट्या पडद्यावर सध्या सारं काही तिच्यासाठी ही मालिका चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. नुकताच या मालिकेत निशी आणि नीरज यांचा लग्नसोहळा पार पडला. त्यामुळे खोतांच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. परंतु, त्यांच्या या आनंदाला गालबोट लागणार आहे. ओवीवर प्राणघातक हल्ला होणार आहे.
झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये एकीकडे खोतांच्या घरात निशीनंतर आता श्रीनूच्या लग्नाची बोलणी सुरु झाली आहेत. तर, दुसरीकडे ओवीवर भररस्त्यात चाकू हल्ला झाला आहे. ज्यामुळे या मालिकेला आता नवं वळण मिळणार आहे.
निशीचं लग्न झाल्यानंतर खोतांच्या घरात लाली श्रीनूच्या लग्नाचा विषय काढते. श्रीनू आणि चारुचं लग्न करुयात असं लाली सांगते. त्यावर, श्रीनूची याला संमती आहे का? असं उमा विचारते. तितक्यात श्रीनू तिथे येतो आणि दादा त्याला या लग्नाविषयी विचारतात. मात्र, त्याचवेळी दादांना निशीचा फोन येतो आणि ती ओवीवर चाकू हल्ला झाल्याचं सांगते.
दरम्यान, ओवीवर अचानक हा हल्ला झाल्यामुळे उमा आणि दादांच्या पायाखालची जमीन सरकते. परंतु, आता तिच्यावर हा हल्ला नेमका केला कोणी? कोणत्या कारणामुळे हा हल्ला झाला असेल? या हल्ल्यामुळे श्रीनू ओवीवरचं प्रेम व्यक्त करेल का? चारु-श्रीनूचं लग्न होईल का? असे बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावर मिळणार आहेत.