छोट्या पडद्यावर तुफान लोकप्रिय ठरलेली मालिका म्हणजे 'माझी तुझी रेशीमगाठ'. ही मालिका सध्या रंजक वळणावर पोहोचली आहे. लवकरच नेहा आणि परांजपे वकिलांचं लग्न होणार आहे. त्यामुळे सध्या नेहाच्या घरात लग्नाची गडबड सुरु आहे. एकीकडे नेहा मनाविरुद्ध लग्न करतीये. तर, दुसरीकडे यशचं मनं खट्टू असल्याचं पाहायला मिळत आहे. या सगळ्यामध्येच परांजपे वकील मात्र लग्न होणार या आनंदात गर्क आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या गडबडात मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार आहे. परांजपे वकिलांचं सत्य समोर येणार असून रागाच्या भरात यश त्यांच्यावर हात उचलणार आहे.
अलिकडेच झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर या मालिकेतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये यश परांजपे वकिलांवर हात उचलतांना दिसणार आहे. नेहाशी लग्न करता यावं यासाठी परांजपे वकिलांनी अनेक डावपेच आखले होते. इतकंच नाही तर त्यांच्या या कटकारस्थानांमध्ये नेहाच्या वहिनीदेखील साथ दिली. विशेष म्हणजे त्यांचा हा डाव साध्य झाला असून नेहा या लग्नासाठी तयार झाली आहे.
परंतु, एकीकडे नेहा-परांजपे यांच्या लग्नाची गडबड सुरु असतानाचा वकिलांचा सत्य समोर येणार आहे. परांपजेंनी नेहाशी लग्न करण्यासाठी ज्या कुरापती केल्या त्या नेहा आणि यश समोर येणार आहेत. त्यामुळे यश परांजपे वकिलांना अद्दल शिकवणार आहे. म्हणूनच आता या मालिकेत पुन्हा एक नवा ट्विस्ट येणार आहे.
दरम्यान, येत्या भागात परांजपे वकिलांचं बिंग फुटणार आहे. त्यामुळे आता नेहाची नेमकी प्रतिक्रिया काय असेल? या मालिकेत पुढे काय होणार? नेहाचा पुन्हा एकदा लग्नसंस्थेवरुन विश्वास उडणार का? असे कितीतरी प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मात्र, या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना येत्या भागात पाहायला मिळणार आहेत.