स्टार प्लसवरील ‘ये रिश्ते है प्यार के’ ही मालिका नातेसंबंध, विवाह आणि कौटुंबिक संबंध यावर भाष्य करते. या मालिकेतून पुरोगामी विचार मांडण्यात आले आहेत. या मालिकेची कथा आपल्या जीवनसाथीची निवड विचारपूर्वक घेण्यावर आधारीत आहे. आता ही संकल्पना आणखी एक पाऊल पुढे नेताना मालिकेच्या निर्मात्यांनी विवाहपूर्व मैत्रीच्या संबंधांच्या विषयाला स्पर्श केला आहे. या मालिकेत मिष्टी या नायिकेची मध्यवर्ती भूमिका रंगविणारी अभिनेत्रीरिया शर्मा हिचे विचारही त्यातील मूळ संकल्पनेशी जुळणारे आहेत.
रिया शर्मा म्हणाली, ये रिश्ते है प्यार केसारख्या मालिकेत मला प्रमुख भूमिका साकारण्यास मिळत असल्याचा मला आनंद वाटतो आणि या मालिकेतील माझ्या मिष्टी या भूमिकेद्वारे विवाहपूर्व मैत्रीच्या संबंधांच्या विषयाला हात घातला आहे.
विवाहपूर्व मैत्री हा काळ असा असतो की दोन व्यक्ती एकमेकांशी विवाहबद्ध होण्यापूर्वी परस्परांचे विचार आणि व्यक्तिमत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. पण हे काही एकतर्फी नाते नव्हे आणि समोरच्या व्यक्तीचे विचार पटले नाहीत, तर कोणालाही कोणत्याही टप्प्यावर विवाहास नकार देण्याचा अधिकार असतो.