छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कुकिंग रिएलिटी शो ‘मास्टरशेफ इंडिया’ काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता प्रसारित होणारा हा शो एक अत्यंत गाजलेला कुकिंग रियालिटी शो आहे आणि या शो ने समस्त भारताचा प्रवास करून अनेक होतकरू होमकुक्सने बनवलेले खाद्यपदार्थ चाखले आहेत जे फक्त दृष्टीलाच नाही तर स्वादग्रंथींना देखील उत्तेजित करणारे होते. रणवीर ब्रार, गरिमा अरोरा आणि विकास खन्ना या तीन परीक्षकांनी TIP म्हणजे टेस्ट, इनोव्हेशन आणि प्रेझेंटेशन या तीन निकषांवर त्यांची पारख केली आणि त्या आधारे टॉप 36 स्पर्धकांमधून टॉप 16 स्पर्धक निवडले.
या टॉप 16 होमकुक्सनी आता टेस्टमेकरपासून चेंजमेकर पर्यंतचा आपला खाद्यप्रवास सुरू केला आहे. अप्रतिम असे ‘मास्टरशेफ इंडिया किचन’ पाककलेचा हा सोहळा अधिक भव्य करेल. या स्वयंपाकघरात अनेक स्वप्ने साकार होतील आणि अनोख्या कहाण्या जन्म घेतील. देशभरात ऑडिशनच्या विविध फेर्यांमधून टॉप 36 स्पर्धक निवडण्यात आले होते. त्यांना ग्रूमिंग सत्रांचा लाभ देण्यात आला आणि परीक्षकांद्वारे अनेक आव्हाने त्यांच्यापुढे ठेवण्यात आली. त्यातून टॉप 16 होमकुक्सची निवड आता करण्यात आली आहे.
आपला ठसा उमटवण्यास सिद्ध असलेले आणि स्वतःच्या नावाचा अप्रन मिळवणारे हे 16 स्पर्धक याप्रमाणे आहेत- कोलकाताची प्रियंका कुंडू बिस्वास, चेन्नईची अरुणा विजय, मुंबईची उर्मिला जमनादास, बंगळूरची प्रिया विजन, कोलकाताची द्युती बॅनर्जी, भुवनेश्वरचा अविनाश पटनाईक, जगीरोड, अमलीघाटहून आलेला संता समर्थ, गुवाहाटीची नाझिया सुलताना, सिरसाचा गुरकिरत सिंह, गाझिपूर सिटीहून आलेला यशू वर्मा, लुधियानाची कमलदीप कौर, लखनौचा सचिन खटवानी, मुंबईची सुवर्णा विजय बागूल, बंगळूरची दीपा चौहान, तिनसुखियाचा नयनज्योती साइका आणि लखनौचा विनीत यादव.
हे टॉप 16 स्पर्धक आता मास्टरशेफ इंडिया किचनमध्ये पाककृती बनवतील. स्पर्धकांना विविध आव्हाने दिली जातील. कधी आपल्या पाककृतीसाठी ठराविक घटक पदार्थच वापरण्याचे बंधन असेल तसेच कुकिंगच्या वेळेची मर्यादा देखील त्यांना घालण्यात येईल. त्यामुळे त्यांचा यापुढचा प्रवास अधिकाधिक कठीण होत जाणार आहे. हे स्पर्धक देशात काही ठिकाणी प्रवास देखील करताना दिसतील, जेथे काही नवी आव्हाने त्यांची प्रतीक्षा करत असतील!