'मास्टर शेफ इंडिया' (Masterchef India) हा टीव्हीवरचा लोकप्रिय रिॲलिटी शो. सध्या या शोचा सातवा सीझन सुरू आहे. या शोमध्ये देशभरातू वेगवेगळ्या राज्यातून आलेले होम शेफ त्यांचं पाककौशल्य दाखवतात. गरिमा अरोरा (Garima Arora), रणवीर ब्रार (Ranveer Brar) आणि विकास खन्ना (Vikas Khanna) हे दिग्गज शेफ या शोचे जजेस आहेत. या तिन्ही जजेसचे अनेक चाहते आहेत. प्रेक्षकांना हे तिघेही आवडतात. पण तूर्तास या तिघांना सोशल मीडियावर जबरदस्त ट्रोल केलं जात आहे. यंदाच्या सीझनमध्ये स्पर्धकांसोबत प्रचंड भेदभाव होत असल्याचा आरोप युजर्स करत आहेत. आता ही काय भानगड आहे, तर ते जाणून घेऊ यात.
तर शोच्या ताज्या एपिसोडमध्ये तिन्ही परिक्षकांनी स्पर्धक अरूणा हिला खास सवलत दिली. सर्व स्पर्धकांना एक मांसाहारी पदार्थ बनवायचा होता. मात्र अरूणाला मांसाहारी डिशसाठी पर्याय उपलब्ध करून दिला गेला. फिश ऐवजी तिला प्रोटीनसाठी पनीर वापरण्याची परवानगी दिली गेली. उर्वरित स्पर्धकांना मात्र फिश वापरूनच पदार्थ बनवायला सांगितलं गेलं. हे चुकीचं असल्याचं प्रेक्षकांनी म्हटलंय.
मास्टर शेफच्या अन्य सीझनमध्ये असा भेदभाव कधीही झाला नाही. अरूणा मांसाहारी नाही, केवळ म्हणून तिला सवलत दिली जात आहे. ती नॉन वेज पदार्थ बनवू शकत नसेल तर तिने शो सोडायला हवा, असं एका युजरने लिहिलं. अन्य एका युजरने मास्टरशेफ ऑस्ट्रेलियाचं उदाहरण दिलं. या शोमध्ये एका भारतीयाला शाकाहारी असूनही बीफ बनवावं लागलं होतं आणि त्याने ते बनवलं सुद्धा. एका शेफला सगळं काही यायला हवं. त्याच्या फूड रूटीननुसार सगळं काही व्हायला नको, अशी प्रतिक्रिया या युजरने दिली.
अनेकांनी हा शो फिक्स्ड असल्याचा आरोपही केला. अरूणा व गुरकिरत यांना जजेस जास्तच फेवर करत असल्याचंही अनेकांनी म्हटलं. अनेकांनी या शोची तुलना बिग बॉसशी केली. या शोमध्ये मराठमोळ्या सुवर्णा बागुल सहभागी झाल्या आहे. त्यांना या शोमध्ये 'ठेचा क्वीन' अशी ओळखही मिळाली आहे. पण परिक्षक सुवर्णा यांना टार्गेट करत असल्याचा आरोपही अनेक प्रेक्षकांनी केला आहे.