Join us  

'उदे गं अंबे...' मालिकेत आदिशक्तीचं रुप साकारणारी मयुरी कापडणेने सांगितला दैवी अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 3:12 PM

Ude Ga Ambe...Katha Sade Tin Shaktipithanchi : स्टार प्रवाहवर ११ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ‘उदे गं अंबे… कथा साडे तीन शक्तिपीठांची’ या पौराणिक मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पहात आहेत.

स्टार प्रवाह(Star Pravah)वर ११ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ‘उदे गं अंबे… कथा साडे तीन शक्तिपीठांची’ (Ude Ga Ambe...Katha Sade Tin Shaktipithanchi) या पौराणिक मालिकेची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पहात आहेत. नवरात्रौत्सवाच्या धामधुमीत महाराष्ट्राची श्रद्धास्थाने म्हणजेच साडे तीन शक्तिपीठांची गोष्ट उलगडणार आहे. या भव्यदिव्य मालिकेत आदिशक्तीची रुपे साकारणार आहे अभिनेत्री मयुरी कापडणे. मयुरीची देवीवर प्रचंड श्रद्धा आहे. योगायोगाने कोल्हापुरच्या अंबाबाईचं दर्शन घेत असतानाच मयुरीला आदिशक्तीचं रुप साकारण्यासाठी विचारणा झाली. हा दैवी अनुभव असल्याची भावना मयुरीने व्यक्त केली. 

मयुरी कापडणे म्हणाली की, मी पहिल्यांदाच पौराणिक मालिकेत काम करतेय. सगळ्यात महत्त्वाचं माहुरची देवी रेणुका, कोल्हापुरची देवी अंबाबाई, तुळजापुरची देवी भवानी, वणीची देवी सप्तशृंगी, सती, पार्वती ही देवीची वेगवेगळी रुपं मी साकारणार आहे. मी जेव्हा स्वत:ला देवीच्या रुपांमध्ये पाहिलं तेव्हा माझाच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हा देवीचाच आशीर्वाद आहे असं मला वाटतं.

आदिशक्तीचं स्वरूप विराट आणि विश्वाकार आहे. ती जगतजननी आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणारी भक्तांची तारणहार आहे आणि म्हणूनच साडेतीन शक्तिपीठांचा महिमा अपार आहे. याच साडे तीन शक्तिपीठांची सविस्तर भावगर्भ आणि भक्तिरसपूर्ण कहाणी म्हणजे 'उदे गं अंबे…कथा साडे तीन शक्तिपीठांची’ ही महामालिका. प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची कोठारे व्हिजन्स प्रायव्हेट लिमिटेड ही निर्मिती संस्था या भव्य मालिकेची निर्मिती करत आहेत.