Join us

माझी तुझी रेशीमगाठ: लग्न न करताच यश आणि नेहा राहणार एकत्र?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 11:00 AM

Mazi tuzi reshimgath : नेहा आणि यश यांच्या नात्याला पुन्हा एक नवं वळण मिळालं आहे. विशेष म्हणजे आता नेहा लग्न न करताच यशच्या घरी राहायला जाणार आहे.

छोट्या पडद्यावरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीत यशस्वी घोडदौड करत आहे. यश आणि नेहा यांच्या नात्यात सुरुवातीपासून अनेक चढउतार आल्याचं साऱ्यांनीच पाहिलं आहे. अनेक अडथळे पार केल्यानंतर या दोघांच्या प्रेमकथेला सुरुवात झाली होती. मात्र, आता ही लव्हस्टोरी खुलत असतानाच आजोबा अचानकपणे आजारी पडल्यामुळे त्यांच्या नात्याला पुन्हा एक नवं वळण मिळालं आहे. विशेष म्हणजे आता नेहा लग्न न करताच यशच्या घरी राहायला जाणार आहे.

नेहा आणि यश यांच्या नात्याविषयी आजोबांना यश सारं काही सांगतो. यात नेहाचं पहिलं लग्न झालं आहे असंही तो सांगतो. मात्र, या प्रसंगानंतर आजोबा अचानक जमिनीवर कोसळतात. परिणामी, सध्या ते अंथरुणाला खिळून आहेत. यामध्येच आजोबांच्या प्रकृतीत किंचितशी सुधारणा व्हायरला लागली आहे. विशेष म्हणजे नेहाच्या पहिल्या लग्नाविषयी त्यांना कळल्यानंतरही ते नेहाचा सून म्हणून स्वीकार करण्यास तयार होतात. परंतु, यामध्येच एक ट्विस्ट आहे.

आजोबा लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी सिम्मीच्या सांगण्यावरुन नेहा आजोबांशी खोटं बोलते. यश आणि मी लग्न केल्याचं ती सांगते. त्यामुळे आता नेहाचा चेहरा पाहून मी दिवसाची सुरुवात करणार असं आजोबा सांगतात. त्यामुळे नेहाला नाईलाजाने लग्नापूर्वीच यशच्या घरी राहायला जावं लागणार आहे.

दरम्यान, नेहाला परी ही एक मुलगी असल्याचं सत्यही आजोबांना अद्याप माहित नाही. त्यामुळे आजोबांपासून अनेक गोष्टी लपलेल्या आहेत. म्हणूनच, नेहाविषयीचं हे सत्य समोर आल्यानंतर आजोबांची काय प्रतिक्रिया असेल? त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल की त्यांना आणखी त्रास होईल हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारश्रेयस तळपदे