सध्या सगळ्याच क्षेत्रांमध्ये AI (आर्टिफिशल इंटेलिजन्स) चा प्रभावीपणे वापर केला जात आहे. अनेक नामांकित कंपन्यांपासून ते आता सिनेसृष्टीतही या माध्यमाचा वापर केला जात आहे. लवकरच छोट्या पडद्यावर 'तू भेटशी नव्याने' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत AI चा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे मराठी कलाविश्वातही AI रुजू लागल्याचं दिसून येत आहे. यामध्येच लोकप्रिय अभिनेत्री शर्मिला राजाराम शिंदे हिने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत.
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेत जेनी ही भूमिका साकारुन लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे शर्मिला राजाराम शिंदे (Sharmila shinde). सध्या ती 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत दुर्गा ही भूमिका साकारत आहे. शर्मिलाने नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने कलाविश्वात AI चा होणारा वापर थांबवा, तो करु नका असं म्हटलं आहे.
काय आहे शर्मिलाची पोस्ट?
"कृपया AI चा वापर टाळा आणि हाडामांसाचे कलाकार कास्ट करा. AI ला फार प्रोत्साहन देऊ नका. कास्टिंग करणाऱ्यांनी थोडे कष्ट घेतले तर एकसारखे दिसणारे कलाकार सापडतील. मी स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमा बघितला नाहीये, पण कौतुक ऐकलंय की, बाबूजींच्या सिनेमामधल्या भूतकाळ आणि वर्तमानातल्या भूमिकांसाठी सुनील बर्वे आणि आदिश वैद्य यांचं कास्टिंग अगदी चपखल बसलंय", असं शर्मिलाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"एखाद्या पात्राच तारुण्य किंवा वृद्धावस्था दाखवायला AI कशाला हवय. कला आणि कलाकार अजून जिवंत आहेत. काही विशेष किंवा अपरिहार्य परिस्थितींमध्ये गरजेपूरतं आणि मर्यादित वापर हा तंत्रज्ञानाचा योग्य वापर म्हणून समजला जाऊ शकतोच," असं तिने पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, शर्मिलाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी ती शेअर सुद्धा केली आहे. शर्मिला मराठी कलाविश्वातील लोक अभिनेत्री आहे. तिने मालिकांसह नाटकांमध्ये काम केलं आहे.