गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत सुरु झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिक प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'नखरेल' शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. सबंध महाराष्ट्रातील तमाम जनतेने डोक्यावर उचलून धरलेल्या या लोकप्रिय मालिकेने नुकतंच अडीच वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आणि ८०० भागांचा टप्पा गाठला.
या मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडियावर मालिकेच्या ८०० भागांच्या पूर्तीसाठी एक स्पेशल पोस्ट शेअर केला ज्यात त्यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. प्रेक्षकांच्या प्रेमाशिवाय हा प्रवास यशस्वी झाला नसता. ८०० भाग पूर्ण केल्याचा आनंद त्यांनी केक कापून साजरा केला. मालिकेतील कलाकार ऑफस्क्रीन देखील तितकीच धमाल करतात. त्यांची ऑनस्क्रीन मस्ती चाहते त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंट्सवर पाहतात. गुरुनाथ, रेवती आणि गुप्ते यांचे म्यूजिकली व्हिडीओजना देखील चाहते तितकेच आवडीने बघतात. सध्या मालिकेत राधिकाने गुरुनाथ आणि शनायाला धडा शिकवण्यासाठी त्यांचा संसार २ महिने स्वबळावर थाटायला सांगितलं आहे. गुरुनाथला नोकरी नसल्यामुळे आणि शनायाला गृहिणीसारखं काम करता येत नसल्यामुळे दोघांचीही वेळोवेळी फजिती होत आहे. आता राधिका गुरुनाथ आणि शनायाला अद्दल घडवण्यासाठी त्यांना कसं तिच्या तालावर नाचवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. या मालिकेने ८०० भागांचा यशस्वी प्रवास पूर्ण करून अडीच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आणि अजून पुढे देखील अनेक वर्ष अनेक भागांचा टप्पा पार करून असंच सर्व रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत राहील यात शंकाच नाही.