तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेद्वारे दिला जाणार स्वच्छ भारत अभियानाचा संदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2017 10:38 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी स्वच्छ भारत अभियान सुरू केले होते आणि या अभियानाचा भारतभर प्रसार व्हावा यासाठी ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी स्वच्छ भारत अभियान सुरू केले होते आणि या अभियानाचा भारतभर प्रसार व्हावा यासाठी विविध क्षेत्रातील लोकांना या अभियानाचे ब्रँड अॅम्बेसेडर बनवले होते. अभिनेता सलमान खानदेखील या अभियानाचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. त्याचसोबत तारक मेहता का उल्टा चष्मा या कार्यक्रमाच्या संपूर्ण टीमचीदेखील ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे या कार्यक्रमाच्या मार्फत नेहमीच स्वच्छता राखण्यासाठी आवाहन केले जाते. स्वच्छता अभिनयाची जागृती करण्यासाठी अनेक भाग मालिकेत नेहमीच दाखवण्यात आले आहेत. आता मालिकेत घरातील कचऱ्याचे कशाप्रकारे रिसायकल करता येऊ शकते हे दाखवले जाणार आहे. घरातील आणि सोसायटीमधील कचरा फेकून देण्याऐवजी पुन्हा त्याचा वापर करता येतो, त्याचे अनेक उपयोग होऊ शकतात यावर आधारित आता तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील काही भाग असणार आहेत.गोकुळधाम सोसायटीमध्ये कचरा वेचणाऱ्या बाईला बरे नसल्याने ती कित्येक दिवस कचरा घ्यायला येऊ शकलेली नाही. घरात खूप कचरा जमा झाल्यामुळे सोसायटीतील सगळेच सदस्य वैतागले आहेत. पण आता या कचऱ्याचे गोकुळधामवासीय रिसायकल कसे करतात हे मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी सांगतात, "तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकाच्या पुढील भागांमध्ये कचऱ्याचे रिसायकल कसे केले जाते हे आम्ही दाखवणार आहोत. तुमच्या घरातील आणि सोसायटीतील कचरा ओला आणि सुका या दोन भागात विभागीत केला पाहिजे ही गोष्टदेखील मालिकेच्या मार्फत शिकवणार आहोत. लोकांना मालिकेतील हे भाग आवडतील अशी मला आशा आहे.