‘दिल से दिल तक’ या मालिकेने लोकप्रीय झालेली अभिनेत्री जास्मीन भसीन हिनेही आपली ‘मीटू’ स्टोरी शेअर केली आहे.होय, झूम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत जास्मीनने आपली आपबीती सांगितली. तिने सांगितले की, ‘मी मुंबईत आले़ त्या स्ट्रगल काळात आॅडिशन्ससाठी, लोकांच्या भेटीसाठी ठिकठिकाणी जावे लागायचे. यादरम्यान माझ्या एका एजन्सीने मला एका दिग्दर्शकास भेटण्यास सांगितले. हा डायरेक्टर एक चित्रपट बनवणार होता. एजन्सीने सुचवल्यानुसार, मी त्या डायरेक्टरला भेटायला आणि आॅडिशन द्यायला गेले. त्याचे आॅफिस वर्सोवात होते. आमची चर्चा सुरू झाली आणि अगदी सुरुवातीलाच काहीतरी विचित्र होतेय, असे मला जाणवले. चर्चेच्या सुरुवातीलाच अभिनेत्री बनण्यासासाठी तू कुठपर्यंत जाऊ शकतेस, काय काय करू शकतेस, असा प्रश्न त्याने मला केला. मग हळूच, मी तुला बिकनीत पाहू इच्छितो़ तू मला कपडे काढून दाखवशील, असे त्याने मला विचारले. मला संशय आला. भूमिकेची तर अशी काहीही मागणी नाही, असे मी त्याला म्हणाले. यावर मी फक्त तुझे बॉडी लूक्स पाहू इच्छितो, असे तो बोलला. मी त्या स्थितीतून पळू शकणार नव्हते. मला त्याला तोंड द्यायचे होते. मग मी खूप चतुराईने हा सगळा प्रसंग हाताळला. तुम्ही म्हणता, त्याप्रमाणे आॅडिशन देण्याच्या स्थितीत मी सध्या नाही. आपण पुन्हा कधीतरी भेटू, असे मी त्या डायरेक्टरला म्हटले आणि तिथून बाहेर पडले. यानंतर मी लगेच माझ्या एजन्सीला कॉल केला आणि हा डायरेक्टर योग्य नसल्याचे सांगितले. एजन्सीने माझी माफी मागितली आणि यापुढे कुठल्याही मुलीला त्या डायरेक्टरकडे पाठवणार नसल्याची हमी मला दिली.’इंडस्ट्रील लैंगिक शोषण होत नाही, असे कुणी म्हणत असेल तर ते चूक आहे. हे सगळे इथे होते, हे कुणीही नाकारू शकत नाही. पण या स्थितीला हाताळणे मुलींना जमायला हवे. ज्यांना आपण ओळखत नाही, अशा व्यक्तिंवर विश्वास ठेवणे टाळले पाहिले, असेही जास्मीन म्हणाली.जास्मीनने टशन ए इश्क, दिल से दिल तक अशा मालिकेत लीड भूमिका साकारली आहे. टीव्ही इंडस्ट्रीत येण्यापूर्वी अनेक साऊथ चित्रपटात तिने काम केले आहे. यात वानम, वेटा, लेडीज अॅण्ड जेंटलमॅन अशा चित्रपटांचा समावेश आहे.
#MeToo: ‘दिल से दिल तक’ फेम अभिनेत्री जास्मीन भसीन हिनेही शेअर केली ‘मीटू स्टोरी’!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 10:13 AM