मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार अंकुश चौधरीनं (Ankush Chaudhari ) तब्बल 15वर्षांनंतर छोट्या पडद्यावर दणक्यात एन्ट्री घेतली आणि एन्ट्रीलाच प्रेक्षकांची मनं जिकंलीत. डॅशिंग अंकुशला ‘मी होणार सुपरस्टार, जल्लोष डान्सचा’ (Mi Honar Suparstar) या डान्स रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकाच्या भुमिकेत पाहून चाहते सुखावले. अशात या शोमध्ये अंकुशने जे काही केलं ते पाहून चाहत्यांची छाती अभिमानानं फुलली. ‘मी होणार सुपरस्टार, जल्लोष डान्सचा’मध्ये महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील स्पर्धक सहभागी झाले आहेत. सोनू कदम हा यापैकीचं एक़ या शोच्या माध्यमातून सोनूला नवं व्यासपीठ मिळालं. अतिशय गरिब कुटुंबातून आलेल्या सोनूनं शोमध्ये येण्यासाठी नोकरी सोडली. पण आता घरासाठी घेतलेल्या कर्जाचे हफ्ते थकले आहेत. हे हफ्ते कसे फेडायचे, ही चिंता त्याला सतावते आहे. गणेशोत्सव स्पेशल एपिसोडमध्ये सोनूची ही चिंता परिक्षकांसमोर आली आणि परिक्षकाच्या खुर्चीवर बसलेला अंकुश देवासारखा त्याच्या मदतीला धावला.
सोनूचं डान्सवरचं प्रेम आणि पुढं जाण्याची जिद्द पाहून अंकुश सोनूच्या प्रेमात पडला आणि त्यानं सोनूला शब्द दिला. होय, ‘तू अजिबात काळजी करू नकोस..., तुझ्या घराच्या कर्जाचे जे काही हफ्ते असतील ते मी देईन...,’ असा शब्द अंकुशनं सोनूला दिला. अंकुशनं शब्द दिला आणि सोनूच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. सर्वांच्याच डोळ्यांत पाणी आलं.
मराठीतील ‘सुना येती घरा’ या चित्रपटातून अंकुशने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. पुढे बॉलिवूडमध्येही त्याचा डेब्यू झाला. ‘जिस देश मे गंगा रेहेता है’ हा त्याचा पहिला हिंदी चित्रपट. 2013 मध्ये ‘दुनियादारी’ या चित्रपटात त्याने दिगंबर शंकर पाटीलची भूमिका यादगार ठरली. आई शप्पथ, जत्रा, यांचा काही नेम नाही, रिंगा रिंगा, लालबाग परळ, यंदा कर्तव्य आहे, दगडी चाळ, ती सध्या काय करते अशा चित्रपटांतून अंकुशने सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरुपी छाप सोडली.