छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉल १२वरून सुरू असलेला वाद थांबायचे काही नाव घेत नाही आहे. अमित कुमार यांच्या वादानंतर काही जुन्या इंडियन आयडॉलच्या स्पर्धकांनी आपले मत व्यक्त केले आहे. इंडियन आयडॉलच्या पहिल्या सीझनचा विजेता अभिजीत सावंतने या सर्व प्रकरणावर आपले मत सांगितले होते आणि म्हटले होते की, आजकाल निर्माते टॅलेंटपेक्षा जास्त गरिबी, लव अँगलला महत्त्व देतात. त्यानंतर आता या शोच्या पाचव्या सीझनचा स्पर्धक मियांग चँगने आपले मत व्यक्त केले आहे.
आजतकच्या रिपोर्टनुसार मियांग चँगने म्हटले की, तो बऱ्याच काळापासून इंडियन आयडॉलच्या टीमच्या संपर्कात नाही. त्यामुळे त्याला या वादाबद्दल फारशी कल्पना नाही. मी जेव्हा पाचव्या सीझनमध्ये होतो आणि जेव्हा शोला दहा वर्षे पूर्ण झाले होते त्यावेळी मी सहभागी झालो होतो. आता शो फॉलो करत नाही. त्यामुळे शोशी संबधीत वादाबद्दल माहित नाही.