काल व्ही. शांताराम यांच्या कन्या आणि पंडित जसराज यांच्या पत्नी मधुरा जसराज यांचं निधन झालं. मधुरा आणि 'आई कुठे काय करते' फेम अभिनेते मिलिंद गवळी यांचे चांगले संबंध होते. त्याविषयी मिलिंद गवळींनी पोस्ट शेअर करुन लिहिलंय की, "मधुरा पंडित जसराज आई काल आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेल्या. दुर्गा ताईंनी मला जेव्हा ही बातमी कळवली आणि मी सुन्न झालो. २००९ ला माझी आई मला सोडून गेली, आणि मी मनाने खूप खचून गेलो होतो, अचानक २०१० च्या सुरुवातीला एका चित्रपटाच्या निमित्ताने मधुराजी जसराज "यांना आपल्याला भेटायचं आहे असा एक मला फोन आला", त्या लतादीदींना भेटून परत घरी जाताना सिद्धिविनायक मंदिराच्या समोरच्या बरीस्ता मध्ये आमची भेट झाली."
मिलिंद गवळी पुढे लिहितात, "मधुराआई म्हणाल्या "मी एक मराठी चित्रपट दिग्दर्शित करते आहे" त्या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी मी एका कलाकाराच्या शोधात आहे", त्यांनी मला चित्रपटाचं नाव सांगितलं "आई तुझा आशिर्वाद" या चित्रपटाचं नाव ऐकूनच मला खात्री पटली की माझ्या आईने माझ्यासाठी हा आशीर्वादच पाठवला आहे, मी मनामध्ये ठरवून टाकलं की हा चित्रपट आपण करायचा, मधुरा आईंना पण मी त्या भूमिकेसाठी योग्य वाटलो, आणि त्या क्षणापासून आमच्यात एक वेगळं नातं निर्माण झालं, मधुराआई इतक्या मोठ्या होत्या की त्याची कोणीही कल्पना करू शकत नाही, त्या व्ही. शांताराम बापू यांच्या त्या कन्या आणि पंडित मार्तंड जसराज यांच्या त्या अर्धांगिनी, आणि त्यांची स्वतःची पण एक वेगळी प्रतिमा. इतक्या मोठ्या व्यक्तीबरोबर मला काम करायला मिळतंय हे माझं भाग्य होतं. आणि माझ्या आईच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नव्हतं."
मिलिंद गवळी पुढे लिहितात, "वयाच्या ७६-७७ वर्षी सुद्धा त्यांच्यामध्ये एका तरुण व्यक्तीची ऊर्जा होती, या सिनेमाचं शूटिंग ची सुरुवात कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात झाली, मुहूर्त कोल्हापूरचे शाहू महाराज आणि पंडित जसराज यांच्या हस्ते झाला, मदुराईंनी हा चित्रपट अगदी सुंदर पद्धतीने दिग्दर्शित केला, या चित्रपटामध्ये पंडित जसराज जी आणि लतादीदी यांचं एक अतिशय सुंदर गाणं आहे ते गाणं मधुराआई नी माझ्यावर चित्रित केलं. चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळेला पण मी त्यांच्याबरोबर असायचो, आमच्यात आई मुलाचं नातं निर्माण झालं, माझी आई मला सोडून गेली आहे याची त्याची मधुरा आईंना सतत जाणीव असायची, त्या इतक्या मोठ्या होत्या तरी मला त्या आईची माया द्यायच्या."
मिलिंद गवळी शेवटी लिहितात, "आज पुन्हा एकदा आई सोडून गेली. मधुरा आई आणि पंडित जसराज यांनी मला त्यांच्या कुटुंबाचा भाग करून घेतलं होतं, आज हे दोघेही महान व्यक्ती आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांचं प्रेम, त्यांनी दिलेली माया आणि त्यांची कीर्ती, सुदैवाने त्यांच्याबरोबर चे क्षण आणि असंख्य मनाला समाधान देणाऱ्या सुंदर आठवणी, कायम माझ्याजवळ राहतील, त्यांच्या आत्म्यास शांती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना."