आई कुठे काय करते फेम अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असतात. मिलिंद यांनी एक नवीन पोस्ट शेअर केलीय. यात त्यांनी दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांची आठवण जागवली आहे. मिलिंद गवळी लिहितात, ""तेजस्विनी"पुण्याच्या रानाडे वाड्यामध्ये या चित्रपटाचं शूटिंग, वाडा अगदी शंभर दीडशे वर्षांपूर्वी चा जुना, सिनेमाची गोष्ट तीन पिढ्यांची, शंभर वर्षांपूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ यामध्ये चित्रपटाची गोष्ट फिरते, सात अतिशय मधुर गाणी, कलाकारांमध्ये माझा आणि शर्वरी जेमिनीसचा डबलरोल, इतर कलाकारांमध्ये कैलासवासी आनंद अभ्यंकर शर्वरीच्या वडिलांच्या भूमिकेत, माझे वडील यांच्या भूमिकेत डॉक्टर विलास उजवणे, त्याचबरोबर सचिन खेडेकर,निर्माते म्हस्के, दिग्दर्शक सतीश रणदिवे, ज्यांच्याबरोबर मी माझं पहिलं मराठी चित्रपट नीलंबरी केलं होतं."
मिलिंद गवळी पुढे लिहितात, "हे शूटिंग करायला फारच मजा येत होती, शंभर वर्षांपूर्वीचा काळ शूट करायचा, त्यामुळे वेगळच वातावरण असायचं, वेगळंच विश्व उभं केलं होतं, आपण त्या काळाचा भाग आहोत असं वाटायचं, वेशभूषा वेगळी भाषा वेगळी, त्यावेळेला मी माझा निकोन d5000 हा कॅमेरा घेऊन शूटिंग ला जायचं, आणि मधल्या वेळामध्ये निसर्गाचे, काही कलाकारांचे फोटोज काढायचं, आनंद अभ्यंकर यांचे मी काही फोटो काढले होते, मला त्यांचे खूप फोटो काढायचे होते पण आम्ही शूटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे ते काढता आले नाहीत. त्याची आजही मला खंत आहे."
मिलिंद पुढे लिहितात, "आनंद अभ्यंकर ही अतिशय गोड व्यक्ती, अतिशय प्रेमळ, एखादा माणूस तुम्हाला आवडूनच जातो, आपल्या आयुष्यामध्ये खूप अशी कमी छान माणसे येतात, अनेकदा त्रासलेली माणसं समोर आली की आपल्याला त्यांच्याशी बोलावसं वाटत नाही, पण आनंद अभ्यंकर सारखी हसमुख मायाळू प्रेमळ या माणसांबरोबर आपण जेव्हा काम करतो, तेव्हा नकळत तुम्ही त्या माणसाच्या प्रेमातच पडतात, आनंदा बरोबर, मी अनेक सिनेमे केले, "सुन लाडकी सासरची" मध्ये पहिल्यांदा माझी आणि त्यांची भेट झाली होती, आणि तेव्हापासून आमची एक वेगळीच घट्ट मैत्री झाली, दुर्दैव असं या शूटिंगच्या दरम्यान पुण्यावरून मुंबईला येताना आनंदाचा एक्सीडेंट झाला, आणि आम्ही सगळ्यांनी एक अतिशय प्रेमळ कलाकार गमावला.
मिलिंद गवळी शेवटी लिहितात, "त्यानंतर निर्माते मस्के यांनी हा चित्रपट पूर्ण करायचा खूप प्रयत्न केला पण तो काही पूर्ण होऊ शकला नाही, आजही हा चित्रपट 90% पूर्ण होऊन बंद पडला आहे, चित्रपट जरी पूर्ण झालं नाही लोकांपर्यंत पोहोचला नाही तरीसुद्धा माझ्याकडे त्याच्या इतक्या सुखद आठवणी आहेत, त्या मी कायम जतन करून ठेवल्या आहेत, आपली माणसं निघून जातात पण आठवणी मात्र कायम आपल्याजवळ ठेवून जातात, हे फोटोज पोस्ट करत असताना Dr विलास उजवणे यांची मला आठवण झाली आणि काल तासभर त्यांच्याशी फोनवर बोलू, माझ्याकडे असलेले फोटोज त्यांना पाठवले, खूप छान वाटलं त्यांच्याशी बोलून. शेवटी माणसाकडे आठवणी राहतात."