छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte). या मालिकेतील प्रत्येक कलाकार त्यांच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झाला आहे. त्यातलीच एक भूमिका म्हणजे अनिरुद्ध देशमुख. अभिनेता मिलिंद गवळी (milind gawali) यांनी ही भूमिका अत्यंत सुंदररित्या साकारली आहे. परंतु, त्यांना प्रथम ही भूमिका करायची नव्हती. त्यांनी या भूमिकेसाठी नकार दिला होता. अलिकडेच एका मुलाखतीमध्ये त्यांनी याविषयी भाष्य केलं आहे.
मिलिंद गवळी यांनी ‘लोकसत्ता ९९९’ ला नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी आई कुठे काय करते या मालिकेविषयी आणि त्यांच्या भूमिकेविषयी भाष्य केलं. सोबतच सुरुवातीला ज्यावेळी अनिरुद्धची भूमिका ऑफर झाली, त्यावेळी मी तयार नव्हतो, असं त्यांनी सांगितलं.
"ही भूमिका करण्यासाठी मी फारसा उत्सुक नव्हतो. त्यावेळी मी सिनेमात काम करत होतो. पण, माझे ८ सिनेमा तयार होऊन सेन्सर होऊन सुद्धा प्रदर्शित झाले नाहीत. त्यामुळे २-३ वर्षांमधलं माझं काम लोकांपर्यंत पोहोचलंच नाही. सोबतच तू मालिकांमध्ये काम का करत नाही? आम्ही फार सिनेमा पाहत नाही. आम्ही चित्रपटगृहांमध्येही जात नाही. मालिका कशा रोज पाहता येतात असं माझे नातेवाईक म्हणायचे. नाशिकचे काही नातेवाईक होते ते तर म्हणाले, आमच्या इथे सिनेमा प्रदर्शितच होत नाही. हे ऐकून माझ्या डोक्यात विचार सुरु झाले की आपण मालिकेत काम करायला सुरुवात करुयात. त्यानंतर मी ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत काम केलं. नंतर माझ्याकडे अनिरुद्धची भूमिका आली. सुरुवातीला मला ही भूमिका करायची नव्हती. पण, मी माझ्या पद्धतीने करेन असं म्हणत काम करायला तयार झालो," असं मिलिंद गवळी म्हणाले.
पुढे ते म्हणतात, “पहिल्या दिवसांपासून मी नकारात्मक भूमिका म्हणून कामाला सुरुवात केली. पण नंतर ही भूमिका करताना माझ्या लक्षात आलं की, ही भूमिका नकारात्मक नाहीये. तो ज्या पद्धतीने मुलांसोबत वागतो, आई-वडिलांचा आदर करतो. तो कष्टाळू असून त्याच्या कामाप्रती खूप प्रामाणिक आहे. संजनालाही खूप मदत करतो.त्याच्यात सकारात्मक बाजूही आहे. फक्त त्याची एक चूक झाली ती म्हणजे लग्न झालेलं असतानाही तो संजनाच्या प्रेमात पडतो. मात्र, त्याने या प्रेमाचाही स्वीकार केला. त्यामुळे माझ्या दृष्टीने अनिरुद्ध ही भूमिका नकारात्मक नाहीये. तोच खरा हिरो आहे. मालिकेत अनिरुद्ध हा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण १२०० भागांमधून सर्व पुरुषांना कळलं असेल काय करू नये.”
दरम्यान, मिलिंद गवळी यांनी अनिरुद्ध ही भूमिका अत्यंत सुंदररित्या वठवली आहे. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.