'मिर्झापूर' फेम शाहनवाज प्रधान (Shahnawaz Pradhan) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. मीडिया रिपोर्टनुसार, शाहनवाज एका कार्यक्रमासाठी गेले असताना त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर लगेचच त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
शाहनवाज प्रधान यांच्या निधनामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त करत आहेत. अभिनेता राजेश तैलंगने शोक व्यक्त करत लिहिले की, शाहनवाज भावा सलाम!! तू माणूस म्हणून किती चांगला होता आणि अभिनेता म्हणून काय दर्जाचा होता हे मी 'मिर्झापूर' या वेबसीरिजच्या शूटिंगदरम्यान पाहिलं आहे. 'मिर्झापूर' या वेबसीरिजमध्ये शाहनवाज यांनी गुड्डू भैयाच्या सासऱ्याची भूमिका केली होती. तर राजेश तैलंगदेखील या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकले होते.
शाहनवाज प्रधान यांचा जन्म ६ डिसेंबर १९६३ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सातवीत असतानाच त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली होती. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना ते नाटकाच्या ग्रुपसोबत जोडले गेले. शाहनवाज यांनी १९९१ साली सिनेइंंडस्ट्रीत करियर करायचे ठरवले आणि त्यासाठी त्यांनी मुंबई गाठली.