मिताली मयेकर,मयुरी वाघ करतायेत जागर स्त्रीशक्तीचा... जागर ‘ती’च्या कर्तृत्वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2017 10:08 AM
स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरुन एखाद्या समाजाची प्रगती मोजत असतो असं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं ...
स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरुन एखाद्या समाजाची प्रगती मोजत असतो असं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं. डॉ. आंबेडकरांनी पाहिलेल्या प्रगत समाजाचं स्वप्न आज साकार होत आहे. कारण आज असं एकही क्षेत्र नाही ज्यात महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला नाही. प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा भिडवून नाही तर त्यांच्या एक दोन पाऊल पुढे असल्याचे पाहायला मिळते. माता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, मदर तेरेसा, इंदिरा गांधी, कल्पना चावला, लता मंगेशकर या आणि अशा कित्येक कर्तृत्ववान महिलांचा आदर्श घेत आजच्या महिला यशाची नवनवी शिखरं पादाक्रांत करत आहेत. नारी शक्तीच्या याच यशाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस म्हणजे जागतिक महिला दिन. महिलांच्या याच हक्काच्या दिनी अभिनय क्षेत्रात आपल्या कार्याने वेगळं स्थान निर्माण करणा-या अभिनेत्रींच्या भावना जाणून घेतल्या. मिताली मयेकर ( फ्रेशर्स) - समाजानं बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज जागतिक महिला दिन जवळ आला की सोशल नेटवर्किंग साईटवर महिलांचे हक्क, महिला सशक्तीकरणाच्या गप्पा मारल्या जातात. मात्र हे सगळे त्या एकदा दिवसापुरतं मर्यादित असते. मात्र वर्षभर हे सारं कुठे असते. महिला सक्षम आहेत हे फक्त महिला दिन आल्यावर बोलणं कितपत योग्य आहे ? एका दिवसासाठी सेलिब्रेशन करायला काही हरकत नाही. एकविसाव्या शतकात राहतोय लोकांना कळलंच पाहिजे की जग कसं पुढे जातंय. प्रत्येक जण बदलत आहे. प्रत्येक गोष्ट बदलते आहे, अगदी त्याचप्रमाणे महिलाही बदलत आहेत. स्त्रियांचे विचार, त्यांची मत पटली नाही तरी चालेल. मात्र स्त्रियांनी काय करावे, काय करु नये हे कुणी सांगू नये. प्रत्येक स्त्रीला माहित आहे की ती काय करते. आम्ही जे करतो त्यात आम्हाला आनंद मिळतो. त्यामुळे तुमचे तथाकथित विचार, सल्ले तुमच्याजवळच ठेवा. कुणावर आणि विशेषतः स्त्रियांवर लादण्याची काहीच आवश्यकता नाही. एखादी तरुणी किंवा महिला कोणासोबत जातो, काय करतो याकडं समाजानं बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. एक मुलगी म्हणून एखादा तिच्याकडे बघतो तेव्हाच समोरच्याचा दृष्टीकोन कळतो. मयुरी वाघ (अस्मिता मालिका फेम)- विद्यार्थिनी, तरुणींना स्वसंरक्षणाचे धडे मिळणे गरजेचे महिला दिन आला की महिलांविषयी बरंच काही उत्साहानं बोललं जातं, मतं मांडली जातात. हे सगळ्यात आधी बंद व्हायला हवं. महिलांच्या सुरक्षेवर जास्त विचार करण्यापेक्षा कृतीची गरज आहे. महिलांची आज सर्वाधिक फसवणूक कुठे होत असेल तर ते म्हणजे सायबर क्राईम. या गोष्टीवर आळा घातला पाहिजे. ब-याचदा म्हटलं जातं की महिलांनी, तरुणींनी हे करु नये, ते करु नये, विविध बंधने घालण्याचा प्रयत्न केला जातो. रात्री उशिरा बाहेर पडू नका, छोटे कपडे घालू नका हे मुलींना सांगण्याऐवजी आधी मुलांना सांगा. विद्यार्थिनी, तरुणींना स्वसंरक्षणाचे धडे मिळणे गरजेचे आहे. यांत पालकांची भूमिकाही महत्त्वाची असते. डान्स क्लास किंवा इतर क्लाससाठी आपण पाठवतो मग सेल्फ डिफेन्ससाठी का नको ? निर्भया प्रकरण म्हणा किंवा बंगळुरुमधील प्रकरण असो अजूनही महिला असुरक्षितच आहे. महिलांबाबत विचार बदलणं गरजेचं आहे. त्यामुळं महिला दिनी मतं मांडण्यापेक्षा त्यापलीकडे जाऊन काही तरी करण्याची गरज आहे.