Join us

खुपते तिथे गुप्ते: बारामतीमधून काकांनी हात बाजूला केला तर यांचं काय होईल?; राज ठाकरेंचा अजितदादांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 16:48 IST

Khupte tithe gupte: 'खुपते तिथे गुप्ते'च्या मंचावर राज ठाकरेंची फटाकेबाजी

गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्ते याचा तुफान गाजलेला 'खुपते तिथे गुप्ते' (Khupte Tithe Gupte) हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. तब्बल १० वर्षांच्या ब्रेकनंतर हा कार्यक्रम सुरु होत असून याच्या पहिल्याच भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हजेरी लावणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो  समोर आला असून राज ठाकरे यांनी त्यांच्या फटाकेबाजीला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. या प्रोमोमध्ये त्यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

झी मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर खुपते तिथे गुप्तेच्या भागाचा प्रोमो शेअर केला आहे.  या प्रोमोमध्ये राज ठाकरे यांनी अजित पवार (ajit pawar) यांच्यावर निशाणा साधत त्यांची मिमिक्रीही केली. इतकंच नाही तर त्यांनी त्यांचा लेक पार्थ पवार यांच्यावरुनही टोला लगावला.

खुपते तिथे गुप्तेच्या मंचावर राज ठाकरे यांना अजित पवारांचा एक व्हिडीओ दाखवण्यात आला. या व्हिडीओमध्ये अजित पवार, राज ठाकरेंविषयी भाष्य करत आहेत. . “एकदा इलेक्शनमधून बाहेर पडल्यावर १४ आमदार निवडून आणले. की सगळे लोक त्यांच्यापासून दूर गेलेले,” असं अजित पवार म्हणतात. हा व्हिडीओ पाहिल्यावर राज ठाकरे यांनीही त्यांच्या शैलीत सडेतोड उत्तर दिलं.

काय म्हणाले राज ठाकरे?

“ए गप रे…असं मी म्हणणार होतो,” असं म्हणत ” अजित पवार स्वत:च्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत. बारामतीत काकांनी हात बाजूला केला, तर यांचं तरी काय होईल?,” असा खोचक सवाल विचार राज ठाकरेंनी अजित पवारांवर निशाणा साधला.

दरम्यान, झी मराठीने हा प्रोमो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर तो क्षणार्थात व्हायरल झाला आहे. हा कार्यक्रम ४ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  राज ठाकरेंप्रमाणेच लवकरच या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी होणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये या शोची उत्सुकता आता दिवसेंदिवस वाढत आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनराज ठाकरेअजित पवारपार्थ पवारसेलिब्रिटी