Join us

‘मोलकरीण बाई’च्या कलाकारांनी धो धो पावसातही पूर्ण केलं शूटिंग, त्यातही केले असे एन्जॉय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2019 10:34 AM

कोणतीही तक्रार न करता ‘मोलकरीण बाई’च्या संपूर्ण टीमने जिद्दीने आणि चिकाटीने हा सीन उत्तमरित्या पूर्ण केला.

कितीही पाऊस झाला, जनजीवन विस्कळीत झालं तरी मुंबई थांबत नाही. मुंबईकरांचं स्पिरिट त्यांना थांबू देत नाही. छोट्या पडद्यावरील ‘मोलकरीण बाई’च्या टीमच्या बाबतीतही काहीसं असंच घडलं. ‘मोलकरीण बाई’ मालिकेत गणपती विसर्जनाचा भाग चित्रित करण्याचं ठरलं होतं. त्यासाठी ठाण्यामध्ये बाप्पाच्या विसर्जनाचा सिक्वेन्स शूट होणार होता. तुफान पावसामुळे चित्रिकरणात बऱ्याच अडचणी येत होत्या. मात्र कलाकार, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ यांचा उत्साह तसुभरही कमी झाला नाही. 

‘मोलकरीण बाई’च्या संपूर्ण टीमने पावसाचं आव्हान स्वीकारत धो धो पावसात चित्रीकरण पूर्ण केलं. गणपती विसर्जनाचं शूटिंग आणि त्यात दुर्गाबाई म्हणजेच उषा नाडकर्णी यांच्या अपहरणाचा सीन शूट होत असल्यामुळे संपूर्ण टीमवर मोठी जबाबदारी होती. रिअल लोकेशनवर शूट होत असल्यामुळे प्रेक्षकांची गर्दीही जमली होती. मात्र कोणतीही तक्रार न करता ‘मोलकरीण बाई’च्या संपूर्ण टीमने जिद्दीने आणि चिकाटीने हा सीन उत्तमरित्या पूर्ण केला.

 

‘मोलकरीण बाई’ मालिकेत अनिताची भूमिका साकारणाऱ्या सारिका नवाथे शूटिंगच्या रोमांचक अनुभवाविषयी सांगितले की , ‘वेगळा अनुभव होता. पावसाचा अंदाज घेऊन लवकरच सेटवर पोहोचलो. मात्र पावसाचा जोर वाढतच गेला. शूटिंग रखडलं होतं. फावल्या वेळात आम्ही अंताक्षरीचा डाव खेळत सेटवर मैफल जमवली. मात्र शूटिंग पूर्ण करणं महत्त्वाचं होतं त्यामुळे थोडा धीर करत भर पावसात सीन द्यायचा ठरवलं. पावसात भिजल्यानंतर भीती कुठच्या कुठे पळून गेली. कोणतीही गोष्ट दिलखुलासपणे स्वीकारावी असं मला वाटतं. एरव्ही पावसात भिजण्याचं धैर्य होत नाही. मात्र मालिकेमुळे एक दिवस पावसात भिजण्याचा संपूर्ण टीमनेच मनमुराद आनंद लुटला.’

टॅग्स :मोलकरीण बाईगणेशोत्सवगणेश विसर्जन