तब्बल १५ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा सर्वांचा लाडका शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' वादात अडकला आहे. आतापर्यंत अनेक कलाकार शो सोडून गेले असून बऱ्याच जणांनी निर्मांत्यावर आरोप केले आहेत. शैलेश लोढा, जेनिफर मिस्त्री, मोनिका भदोरिया अशा काही कलाकारांनी निर्माते असित मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. मालिकेत 'बावरी' ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मोनिका भदोरियाने (Monica Bhadoria) तर आत्महत्येचा विचार केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
मोनिका भदोरियाने काही वर्षांपूर्वीच मालिका सोडली. आता मालिकेत नवीना वाडेकर बावरी ही भूमिका साकारत आहे. पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत मोनिका म्हणाली, " मी मोठ्या कौटुंबिक संकटातून जात होते. मी आई आणि आज्जी दोघींना गमावलं होतं. ते माझ्या जीवनाचा आधार होते. त्यांनीच मला वाढवलं होतं. मी या संकटातून जात असताना मला वाटलं माझं आयुष्यच संपलं. तेव्हा मी तारक मेहता मध्ये काम करत होते. सेटवर मला खूप टॉर्चर केले गेले. मला आत्महत्येचे विचार यायचे."
ती पुढे म्हणाली, "निर्माते मला म्हणायचे की तुझ्या वडिलांचं निधन झालं आहे आणि आम्ही पैसे दिले आहेत. आजारी आईच्या उपचारासाठी पैसे दिले आहेत. या शब्दांमुळे मी आतून कोलमडून गेले होते. जगायची इच्छाच राहिली नव्हती. मी माझ्या आजारी आईला शेवटचं सेटवर आणू इच्छित होते. मी काय काम करते हे तिने बघावं. पण सेटवरचं वातावरणच असं होतं की मी तिला नाही घेऊन येऊ शकले."
मोनिकाला मिळाली धमकी
मोनिका म्हणाली, "सेटवर होणाऱ्या टॉर्चरविरोधात मी खूप आधीच खुलासा करणार होते. पण मेकर्सने माझ्यासोबत बॉन्ड साईन केला होता. जर मी तो तोडला असता तर माझा पगार थांबला असता. बॉन्ड साईन झाल्यानंतरही दिड वर्ष मला पगार दिला नाही. शो सोडताना असित मोदींनी मला टीव्हीमध्ये परत काम करता येणार नाही अशी धमकी दिली होती."