Join us

‘बिग बॉस’च्या घरात मोनालिसाने केले बॉयफ्रेंडशी लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2017 7:01 PM

बिग बॉसचा सिझन-१० अनेक कारणांनी चर्चेत ठेवण्यासाठी निर्मात्यांनी जणू काही चंगच बांधला आहे. एका पाठोपाठ एक वादग्रस्त घटना - ...

बिग बॉसचा सिझन-१० अनेक कारणांनी चर्चेत ठेवण्यासाठी निर्मात्यांनी जणू काही चंगच बांधला आहे. एका पाठोपाठ एक वादग्रस्त घटना - घडामोडी समोर आल्यानंतर आता घरात सनई-चौघडे वाजविण्यासाठी बिग बॉसच्या निर्मात्यांनी तयारी सुरू केली आहे. होय, हे खरं आहे. बिग बॉसची स्पर्धक मोनालिसा तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न करणार आहे. बिग बॉसच्या घरातील हा दुसरा विवाह असून, त्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. आतापर्यंत बिग बॉसच्या घरात बहरलेल्या प्रेमप्रकरणातील लव्ह बर्डस्ना डेटवर पाठविण्याची व्यवस्था बिग बॉसने केल्याचे आपण बघितले आहे. मात्र आता घरात चक्क लग्न लावले जाणार आहे, यापूर्वीदेखील बिग बॉसच्या घरात सारा खान आणि अली मर्चंट यांचा विवाहसोहळा पार पडला होता. मात्र नंतर हा सोहळा वादात सापडला होता. त्यामुळे बिग बॉसच्या निर्मात्यांनी मोनालिसाचा विवाहसोहळा पार पाडण्यासाठी अतिशय बारीकसारीक गोष्टींचा विचार केला आहे. शोच्या पहिल्या दिवसापासूनच भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा चर्चेत आहे. सुरुवातीला मनू पंजाबी याच्याबरोबरच्या संबंधामुळे ती चर्चेत आली होती. ज्या पद्धतीने दोघांमध्ये केमिस्ट्री होती त्यावरून त्यांच्यात काहीतरी सुरू असल्याची शंका प्रेक्षकांना येत होती. दोघांमधील प्रेमप्रकरण बहरत असतानाच सलमान खान याच्या वीकेण्ड का वॉर या एपिसोडमध्ये मोनालिसाचा बॉयफ्रेंड विक्रांत सिंह याने हजेरी लावून मनू पंजाबी आणि मोनालिसांमधील केमिस्ट्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्याचबरोबर या दोघांमध्ये मैत्रीपलीकडचे नाते असल्याचाही दावा केला होता. मात्र विक्रांतने बिग बॉसच्या शोमध्ये हजेरी लावल्यावरून अनभिज्ञ असलेल्या मोना आणि मनू यांच्यातील जिव्हाळा दिवसेंदिवस वाढत गेला. या दोघांच्या स्टोरीत ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा मनू पंजाबी याला त्याच्या आईच्या निधनामुळे काही दिवस घराबाहेर जावे लागले. त्यादरम्यान विक्रांत सिंह आणि मनू पंजाबी हे एकमेकांना भेटले असल्याचा दावा मनूने केला होता. घरात परतल्यानंतरही मनूचे मोनाप्रतीचे आकर्षण कमी झाले नव्हते, परंतु मोनाला तिचा बॉयफ्रेंड विक्रांत मनूसोबतच्या जवळिकतेमुळे नाराज असल्याची भनक लागली होती. जेव्हा बॅटरी रिचार्ज टास्कमध्ये विक्रांत सिंह याला घरात जाण्याची संधी मिळाली तेव्हा खºया अर्थाने मोनाला धक्कादायक परिस्थितीचा सामना करावा लागला. विक्रांतने सर्व घरवाल्यांसमोर मनू पंजाबीचे उणेदुणे काढत मला माझ्या मोनावर विश्वास असल्याचे स्पष्ट केले होते. हा सर्व ड्रामा बिग बॉसच्या घरात घडल्याने मनू पंजाबी, मोनालिसा आणि विक्रांत सिंह यांची स्टोरी प्रेक्षकांसाठी जिव्हाळ्याचा विषय ठरली आहे. नेमका हाच धागा पकडून बिग बॉसच्या निर्मात्यांनी शोमध्ये ट्विस्ट आणण्यासाठी मोनालिसा आणि विक्रांत सिंह यांचा विवाह लावण्याचे ठरविले आहे. जेव्हा याविषयी मोनाचा बॉयफ्रेंड विक्रांत सिंह याला विचारण्यात आले तेव्हा त्याने तातडीने बिग बॉसच्या निर्मात्यांना होकार दिला. मी मोनावर खूप प्रेम करतो, मला राष्ट्रीय चॅनेलवर तिच्याशी विवाह करण्याची संधी मिळाल्यास माझे भाग्यच असेल. मोना माझ्यावर प्रचंड प्रेम करीत असून, ती सुद्धा यामुळे हरकून जाईल, असेही विक्रांतने सांगितले. दरम्यान, मोठ्या थाटामाटात लग्नाची तयारी सुरू असून, सोमवारी हा विवाह लागेल असे निर्मात्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. बिग बॉसच्या शोमधील हा दुसरा विवाह असून, मनू पंजाबी त्याचा साक्षीदार ठरणार असल्याने हा विवाह कायम स्मरणात राहील, यात शंका नाही.