मराठी 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' मधून घराघरात पोहोचलेले प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) आणि मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) चर्चेत आले आहेत. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी प्रेमाची कबुली दिल्यानंतर हे कपल प्रसिद्धीझोतात आलं. लवकरच दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. मुग्धा प्रथमेशहून चार ते पाच वर्षांनी लहान आहे. एकीकडे या दोघांसाठी चाहते आनंदित असतानाच दुसरीकडे काही लोकांनी मुग्धाला एवढ्या कमी वयात लग्न का करत आहे असाही प्रश्न विचारला. यावर प्रथमेश -मुग्धाचे लग्नाबाबतीतील विचार त्यांनी एका कार्यक्रमातून मांडले आहेत.
आजकाल लग्नच नको असं म्हणणारे अनेक तरुण-तरुणी आहेत. लग्नानंतरची येणारी जबाबदारी, सध्या चाललेल्या सुखी आयुष्यात कोणाचीही लुडबूड नको असं वाटणं या कारणांमुळे आजची पिढी लग्नापासून पळतेय. या विषयावर मु्ग्धा म्हणाली,'सगळ्यात महत्वाचं मला यात वाटतं ते म्हणजे आपल्या पिढीला मिळालेलं एक्पोजर. या एक्सपोजरमुळे सगळ्याच गोष्टींचं खूप स्वातंत्र्य मिळालं. या स्वातंत्र्याची एवढी सवय झालेली आहे की एखादा माणूस आपल्या सर्कलच्या आत आला तर आपलं स्वातंत्र्य जाणारे हे मुलींना जास्त वाटतं.'
ती पुढे म्हणाली, 'मला तरी असं कधी वाटलं नाही कारण आपल्या आईबाबांमुळे, त्यांनी दिलेल्या संस्कारांमुळे म्हणा मला नाही वाटलं. पण एक जे कम्फर्ट झोन आहे की माझं माझं वेगळं जग आहे बाबा मला ते प्रिय आहे तू काही माझ्या फार सर्कलमध्ये येऊ नको याची एक भीती वाटते मुलींना हे महत्वाचं कारण आहे जे नकोय कोणाला. दुसरं म्हणजे जबाबदारी जी कोणालाच नकोय हल्ली. या कारणांमुळे मुलं/मुली लग्नापासून दूर पळत आहेत.'
प्रथमेश-मुग्धाच्या या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. कोणाला मुग्धाचं म्हणणं पटलंय तर ही फक्त एकच बाजू असल्याचं काही जणांनी कमेंट केली आहे. प्रथमेश-मुग्धा दोघंही संगीत क्षेत्रात आहेत. त्यांचे अनेक कार्यक्रम हे एकत्रित होतात. त्यामुळे दोघांचेही सूर जुळले आहेत.