Join us  

वयाच्या 65 व्या वर्षीही मुकेश खन्ना आहेत अविवाहित; 'या' कारणामुळे केलं नाही अद्यापही लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 10:38 AM

Mukesh Khanna: मुकेश खन्ना आज ६५ वर्षांचे आहेत या काळात यांनी यश, प्रसिद्ध, संपत्ती सारं काही कमावलं. मात्र, अजूनही लग्न केलं नाही. त्यामुळे त्यांचे चाहते कायम त्यांना याविषयी प्रश्न विचारत असतात.

'महाभारत' या गाजलेल्या मालिकेतून नावारुपाला आलेला अभिनेता म्हणजे मुकेश खन्ना (Mukesh Khanna). या पौराणिक मालिकेत मुकेश यांनी पितामह भीष्म ही भूमिका साकारली होती. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्यांचं एक वेगळं स्थान आहे. उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारा हा अभिनेता त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठीही कायम चर्चेत असतात. समाजात घडणाऱ्या घटनांवर उघडपणे भाष्य करणाऱ्या मुकेश यांनी पहिल्यांदाच त्यांच्या पर्सनल आयुष्यावर भाष्य केलं आहे. वयाची साठी ओलांडल्यानंतरही त्यांनी आजही लग्न का केलं नाही याचं कारण सांगितलं आहे.

मुकेश खन्ना आज ६५ वर्षांचे आहेत या काळात यांनी यश, प्रसिद्ध, संपत्ती सारं काही कमावलं. मात्र, अजूनही लग्न केलं नाही. त्यामुळे त्यांचे चाहते कायम त्यांना याविषयी प्रश्न विचारत असतात. म्हणूनच, त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लग्न न करण्यामागचं कारण जाहीरपणे सांगितलं आहे.

...म्हणून मुकेश खन्ना यांनी केलं नाही लग्न

"सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मुकेश खन्ना यांनी इन्स्टाग्रामवर भीष्माचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी स्वत: लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं. एक भीष्म प्रतिज्ञा कोणाचं लग्न थांबवू शकते का? लोकांना असं वाटतंय की माझ्यासोबत असं काही झालंय. पण, मी असा विचार करत नाही. लग्न म्हणजे दोन मनांचं मिलन असतं. कदाचित ते मन मला अजूनपर्यंत भेटलच नाहीये. लोकांना असं वाटतं की ज्यांच्या गर्लफ्रेंड अधिक तोच खरा पुरुष. पण, असे माझे विचार कधीच नाहीत. पत्नीने पतिव्रता असावं अशीही लोकांची अपेक्षा असते. मात्र, मला वाटतं पतीने सुद्धा पत्नीव्रता असायला हवं. पण, एक मात्र नक्की आहे की, भीष्म प्रतिज्ञेमुळे मी अविवाहित आहे असं काही नाही", असं मुकेश खन्ना म्हणाले.

मुकेश खन्ना यांनी महाभारत या मालिकेत भीष्माची भूमिका साकारली होती. त्यामुळे या मालिकेत भीष्म प्रतिज्ञेचा सीन दाखवला होता. पडद्यावर त्यांनी भीष्मप्रतिज्ञा केल्यामुळेच खऱ्या आयुष्यातही त्यांनी लग्न केलं नाही असं अनेकांना वाटत होतं. मात्र, तसं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान,  मुकेश खन्ना आज ६५ वर्षांचे असून २०१६ मध्ये वारिस या मालिकेत झळकले होते. त्यानंतर ते फारसे कोणत्या मालिकेत वा सिनेमात दिसले नाहीत. त्यांचं स्वत:चं युट्यूब चॅनेल आहे.  या चॅनेलच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात रहात असतात. मुकेश खन्ना यांची शक्तीमान ही भूमिका सुद्धा प्रचंड गाजली. त्यांची ही मालिका जवळपास ८ वर्ष टेलिव्हिजनवर सुरु होती.

टॅग्स :मुकेश खन्नाटेलिव्हिजनटिव्ही कलाकार