स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Jhali Ho ) या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या मालिकेतून अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांना रातोरात काढून टाकण्यात आलं. सोशल मीडियावर राजकीय भूमिका घेतल्यानं आपल्याला मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचा आरोप किरण मानेंनी केला आहे. मात्र स्टार प्रवाह वाहिनी व मालिकेच्या निर्मात्यांनी त्यांचा हा आरोप धुडकावून लावत त्यांच्या गैरवर्तनामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्यात आल्याचं म्हटलं आहे. हा वाद तूर्तास चांगलाच गाजत आहेत. पण प्रेक्षकांना मात्र वेगळाच प्रश्न सतावतो आहे. ‘मुलगी झाली हो’ मालिकेत किरण माने विलास पाटीलची भूमिका साकारत होते. त्यांना मालिकेतून डच्चू दिल्यावर त्यांच्या जागी ही भूमिका कोण साकारणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. मात्र लवकरच याचाही खुलासा होणार आहे.
होय, चर्चा खरी मानाल तर, किरण मानेंच्या जागी अभिनेते आनंद अलकुंटे यांची वर्णी लागल्याचं कळतंय. आनंद अलकुंटे विलास पाटील यांची भूमिका साकारणार असून त्यांनी शूटींग सुरू केल्याचीही माहिती आहे. तथापि प्रोडक्शन हाऊसकडून अद्याप कोणतीच अधिकृत माहिती मिळाली नाही.
आनंद अलकुंटे (Anand Alkunte) ‘रुद्रम’ मालिकेत पोलिसांच्या भूमिकेत दिसले होते. अनेक मराठी चित्रपटांमध्येदेखील त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. बंदिशाळा, जोगवा अशा अनेक सिनेमात त्यांनी काम केलं आहे. मात्र आता ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत विलास पाटीलाची भूमिका ते कशी रंगवतात, या भूमिकेला किती न्याय देतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दरम्यान, किरण माने यांना मालिकेतून काढल्यानंतर मालिकेचं पोस्टर देखील बदलण्यात आलं आहे. यात किरण मानेंना वगळण्यात आलं आहे.