'बिग बॉस हिंदी'च्या नव्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे. 'बिग बॉस 17'मध्ये या रिएलिटी शोचं स्वरुप पूर्णपणे बदलण्यात आलं आहे. या शोमध्ये छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय कलाकारांनी एन्ट्री घेतली आहे. स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीदेखील आहे. नुकतेच कार्यक्रमाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये मुनव्वर हा आपल्या आईबद्दल बोलताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
बिग बॉसच्या घरात रिंकू धवन आणि ऐश्वर्याशी बोलत असताना मुनव्वर फारुकी त्याच्या दिवंगत आईच्या आठवणीने भावूक झाला. तो म्हणाला, 'मी 13 वर्षांचा असताना आईचे निधन झाले. आईचे वैवाहिक जीवन खूपच खराब होते आणि तिच्यावर कर्जही होते. त्यामुळे तिला खूप अपमान सहन करावा लागला. 3000 रुपये कर्ज होते आणि तिने आत्महत्या केली'.
याआधी एकदा वडिलांबद्दल बोलताना रडला होता. विक्की जैनशी बोलताना तो म्हणाला होता, '2018 मध्ये माझं कुटुंब बिग बॉस कार्यक्रम पाहायचे. मी या शोमध्ये जावं अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. आता राहिले नाहीत आणि मी येथपर्यंत पोहचलो आहे. आज ज्या ठिकाणी मी आहे. तिथपर्यंत पोहचण्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला आहे'. वडिल आणि आपल्या प्रवासाबद्दल बोलताना तो आपले अश्रू थांबवू शकला नव्हता.
मुनव्वर फारुकी हा लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन आहे. आपल्या विनोदाने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करणाऱ्या मुनव्वरला वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. मुनव्वर फारुकीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. कंगना रनौतचा 'लॉकअप' हा कार्यक्रम त्याने जिंकला असून आता 'बिग बॉस 17'च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी तो सज्ज आहे.