Join us

'चार गाड्यांमध्ये एक रिक्षा असेल तर...'; मुनव्वरने उडवली हेमांगी कवीची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2024 16:05 IST

Hemangi kavi: मुनव्वरने हेमांगीच्या लूक्सवरही कमेंट केली आहे.

छोट्या पडद्यावर अलिकडेच 'मॅडनेस मचायेंगे इंडिया को हंसाएंगे' हा नवा कॉमेडी रिअॅलिटी शो सुरु झाला आहे. या शोमध्ये कुशल बद्रिके आणि हेमांगी कवी हे मराठी कलाकारही सहभागी झाले आहेत. मात्र, या शोमध्ये बिग बॉस फेम मुनव्वर फारुकीने हेमांगीची चारचौघात खिल्ली उडवली आहे.

९ मार्च रोजी सुरु झालेल्या या कार्यक्रमात बिग बॉस १७ फेम मुनव्वर फारुकी पहिला गेस्ट म्हणून सहभागी झाला होता. यावेळी स्टँड अप करताना त्याने हेमांगीची खिल्ली उडवली.सध्या त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या शोमध्ये हर्ष गुजराल आणि मुनव्वर दोघंही एकत्र 'यूपी वर्सेस डोंगरी' नावाचा स्टँड-अप करत होते. यावेळी मुनव्वरने स्टेजवर हेमांगीची मस्करी केली.

हेमांगीविषयी नेमकं काय म्हणाला मुनव्वर?

या व्हिडीओमध्ये मुनव्वर, समोर बसलेल्या हेमांगीचा उल्लेख दादी म्हणून करतो. इतकंच नाही तर पुढे तो म्हणतो, मला आधीच कळलं होतं की इथे हेमांगी आलेली आहे. त्यावर कसं काय? असा प्रश्न हेमांगी विचारते. त्यावर, बाहेर चार महागड्या कार उभ्या होत्या आणि त्यामध्ये एक रिक्षा उभी होती. आणि, अजून एक तू आता चेहरा धुवून आली होतीस ना तेव्हा खूप छान दिसत होतीस. तो मेकअप होता? असा प्रश्न मुनव्वरने विचारला. त्यावर, नाही असं उत्तर हेमांगीने दिलं. यावर, मेकअप असो किंवा नसो तसंही मी तुला ओळखत नाही, असं म्हणत मुनव्वरने तिची खिल्ली उडवली.

दरम्यान, मुनव्वरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात अनेकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली आहे. यात अनेकांनी मुनव्वरला ट्रोल केलं आहे.  'मॅडनेस मचायेंगे, इंडिया को हसाएंगे' या कार्यक्रमात हेमांगी व्यतिरिक्त इंदर साहनी, परितोष त्रिपाठी, हर्ष गुजराल, गौरव दुबे, केतन सिंह, कुशल बद्रिके, अंकिता श्रीवास्तव, स्नेहिल मेहरा हे कलाकार सहभागी झाले आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनहेमांगी कवीसेलिब्रिटीटिव्ही कलाकारकुशल बद्रिके