स्टार प्रवाह वाहिनीवर नुकतीच दाखल झालेली शशांक केतकरची नवीन मालिका 'मुरांबा'चे दिग्दर्शन विघ्नेश कांबळे करत आहेत. त्यांनी यापूर्वी 'कुसुम', 'हंड्रेड डेज', 'आई माझी काळूबाई', 'गोठ', ग्रहण, स्पेशल ५, कळत नकळत' या मराठी मालिकांचे तर 'अल्लादीन', 'थपकी प्यार की', 'अर्जुन', 'सुहानी सी लडकी', डिटेक्टिव्ह देव या हिंदी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. नुकतेच त्यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत छोट्या पडद्यावरील दिग्दर्शकांबाबत खंत व्यक्त केली.
विघ्नेश कांबळे यांनी हिंदी आणि मराठी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. तिथे काम करताना काय फरक जाणवतो, याबद्दल विचारले असता ते म्हणाले की, हिंदी आणि मराठी छोट्या पडद्यावर काम करताना फक्त भाषेचा फरक मला वाटतो. मराठी आणि हिंदीत बाकी काम करण्याची पद्धत सारखीच आहे. दोन्हीकडे चांगलेच आणि प्रामाणिक काम करायचे असते. परंतु दोघांच्या मानधनात खूप तफावत असते. खरेतर मराठीत काम करायला खूप मजा येते. कारण मराठीत ७० ते ८० टक्के कलाकारांनी नाटकात काम केलेले असते. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना खूप वेगळी एनर्जी मिळते. मलादेखील रंगभूमीची पार्श्वभूमी आहे. मी चेतना कॉलेजमध्ये शिकलो आहे. तिथे शिकत असताना गणेश यादव, किशोर कदम, हेमंत प्रभू, गिरीश महाजन यांच्या सोबतीने वाढलो आहे. त्यामुळे मराठीत काम करायला मज्जा येते. हिंदीसारखे प्रोफेशनली दडपण मराठीत काम करताना नसते. थोडा चेंज म्हणून मी हिंदी व मराठीत काम करत असतो.