'मुरांबा' ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. 'मुरांबा'मध्ये अभिनेता शशांक केतकर मुख्य भूमिकेत आहे. या मालिकेतील रमा-अक्षयची जोडी प्रेक्षकांना आवडते. 'मुरांबा' टीममधील एका कलाकाराच्या पत्नीला कानाने ऐकू येत नाही. त्यासाठी सर्जरी करावी लागणार आहे. या कलाकाराला मदतीची गरज आहे.
मेकअपआर्टिस्ट असलेल्या विशाल कांबळे यांच्या पत्नीला कानाचे इन्फेक्शन झाले आहे. त्यामुळे सर्जरी करावी लागणार आहे. पण, यासाठी लागणारा खर्च लाखोंच्या घरात आहे. या मेकअप आर्टिस्टला मदत करण्याचं आवाहन शशांक केतकर आणि 'मुरांबा'च्या टीमने केलं आहे. शशांकने इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. "नमस्कार, 'मुरांबा'च्या सेटवरचा विशाल हा लाडका आणि आवडता मेकअप आर्टिस्ट आहे. आणि त्याच्या मिसेस मेघा. हा व्हिडिओ करण्याचं एक कारण आहे. गेली काही वर्ष यांना कानाचं इन्फेक्शन झालं होतं. ते इन्फेक्शन दोन्ही कानांना झालं. आधी थोडं थोडं ऐकू येत होतं. त्या इन्फेक्शनवर उपचारही केले. त्यालाही बराच खर्च झाला. पण, दुर्देवाने ते इन्फेक्शन पूर्णपणे बरं झालं नाही".
"आणि त्यामुळे त्यांना आता ऐकू येत नाही. तोंडाच्या हालचालींवरून आपण काय बोलतोय हे त्या जाणून घेतात. आणि मला खात्री आहे की डॉक्टरांचा सल्ला आणि आम्हा सर्वांच्या मदतीने त्यांना पूर्णपणे ऐकू येईल. पण, या उपचारासाठी येणारा खर्च हा खूप मोठा आहे. हा खर्च एक रकमी देणं शक्य नाही. यासाठी २० लाखाचा खर्च येणार आहे. आणि २० लाख रुपये हे आम्हा कोणासाठीही अवघड आहेत. तर यांच्या पाठीशी आपण सगळे उभे राहुयात", असं म्हणत शशांकने मदतीचं आवाहन केलं आहे.