Join us  

संगीतकार अजय-अतुल खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 3:47 PM

Kon Honaar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर महाराष्ट्राचे लाडके संगीतकार अजय-अतुल विशेष पाहुणे सहभागी होणार आहेत.

संगीतकार अजय - अतुल या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या शनिवारी 'कोण होणार करोडपती'च्या या पर्वाचा शेवटचा भाग असून अजय- अतुल यांच्या उपस्थितीत या पर्वाची सांगता होणार आहे. जेजुरी येथील  शीघ्रकवी शाहीर सगनभाऊ स्मृती मंच या लोकवंतांसाठी कार्यरत असणार्‍या संस्थेसाठी अजय-अतुल हा खेळ खेळणार आहेत.

'कोण होणार करोडपती'च्या या पर्वातही दर आठवड्यातल्या शनिवारच्या भागात विशेष पाहुणे सहभागी झाले. समाजकल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट आणि त्यांचे कार्य या विशेष भागांतून प्रेक्षकांसमोर येते. या पर्वात आत्तापर्यंत प्रसिद्ध अभिनेत्री काजोल, तनुजा, ज्येष्ठ समाजसेविका आणि लेखिका सुधा मूर्ती, सदाबहार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, संदीप वासलेकर, अधिक कदम, डॉ. तात्याराव लहाने, द्वारकानाथ संझगिरी  या भागांमध्ये सहभागी झाले होते. ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष रंगला.

आता या पर्वाची सांगता अजय-अतुल या लोकप्रिय जोडगोळीने होणार आहे. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाची म्युझिकल थीम आणि अजय अतुल यांचं विशेष नातं आहे त्याबद्दल त्यांनी या भागात त्या आठवणींना उजाळा दिला.  'शाहीर साबळे, शाहीर विठ्ठल उमप, अण्णाभाऊ साठे, प्रल्हाद शिंदे या सगळ्या लोककलावंतांनी  मराठी साहित्य आणि संस्कृतीचे जतन करून अमूल्य वारसा आपल्याला उपलब्ध करून दिला. आमच्यावरही गाण्याचे संस्कार या लोकलावंतांनी केले आहेत', असे मनोगत अजय अतुल यांनी 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर व्यक्त केले. त्याचबरोबर संगीत ही शिकत राहण्याची गोष्ट आहे, त्यामुळे शिकत राहा, असा सल्ला त्यांनी तरुण कलाकरांना यावेळी दिला.

 

टॅग्स :संगीतसोनी मराठी