Join us

‘गाणं माझं सर्वस्व!’-अवंती पटेल

By अबोली कुलकर्णी | Published: August 09, 2018 4:30 PM

अवंती पटेल ही सध्या ‘इंडियन आयडॉल सीझन १०’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसत आहे. तिने आत्तापर्यंत तिच्या बहारदार गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे.

मुळची गुजराती पण मुंबईची मुलगी असलेली अवंती पटेल ही सध्या ‘इंडियन आयडॉल सीझन १०’ मध्ये स्पर्धक म्हणून दिसत आहे. तिने आत्तापर्यंत तिच्या बहारदार गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले आहे. वयाच्या ५व्या वर्षापासूनच ती शास्त्रशुद्ध संगीताचे धडे घेत आहे. ‘गाणं माझं सर्वस्व असून त्याशिवाय मी माझ्या आयुष्याचा विचारच करू शकत नाही,’ असे देखील तिने मुलाखतीदरम्यान सांगितले. 

 * ‘इंडियन आयडॉल’च्या १०व्या सीझनमध्ये दिसत आहेस. तुझ्यासोबत बरेच कंटेस्टंट आहेत. काय सांगशील? कशी आहे तुमची सगळयांची बाँण्डिंग? - आमची बाँण्डिंग खूप छान आहे. आम्ही एकमेकांना खूप प्रोत्साहन देत असतो. आम्ही एक शो म्हणूनच या स्पर्धेकडे पाहतो. स्पर्धेमध्ये उतार-चढाव हे तर चालूच राहतात. पण, आम्ही कधीही एकमेकांचा आत्मविश्वास ढळू देत नाही. स्पर्धा असली तरीही आम्ही ती एन्जॉय करत असतो.

 * शोचे जजेस अनु मलिक, विशाल ददलानी आणि नेहा कक्कर यांच्याकडून तुला काय शिकायला मिळतेय?- होय, शोचे जजेस हे इंडस्ट्रीतील टॉपचे दिग्गज आहेत. प्रत्येकाची आपापली एक खासियत आहे. अनु मलिक सर यांनी खूप मोठया कलाकारांसोबत काम केले आहे. ते शेअर करत असलेल्या अनुभवांतून शिकायला मिळतं. तसेच विशाल सर यांच्याकडून गाण्याकडे बघण्याचा दृष्टीकोन कळतो. शिवाय नेहा कक्कर या एक उत्तम प्रेझेंटर आहेत. त्या एकदा स्टेजवर आल्या की स्टेजचा संपूर्ण माहोलच बदलून जातो. 

* वडील पंकज पटेल हे सर्जन आणि आई अनिता पटेल युरोलॉजिस्ट आहेत. एकं दरित, मेडिकल बॅकग्राऊंड असूनही तू संगीतक्षेत्राकडे कशी वळलीस? आणि घरच्यांचा सपोर्ट कसा असतो?- खरंतर आमच्या घरी डायनिंग टेबलवर सगळया हॉस्पिटलच्याच गप्पा असतात. मी आणि माझी बहीण आता अर्ध्या डॉक्टरच झालो आहोत. पण, माझ्या घरच्यांचा मला कायम पाठिंबा असतो. माझी आई ती लहान असतानापासून गाते. ती स्वत: संगीतविशारद आहे. त्याशिवाय माझे बाबा मला खुप सपोर्ट करतात. मला ते मेडिकल, इंजिनियरिंग किंवा नोकरी करण्यासाठी कधीही दडपण आणत नाहीत. तूला जे आवडतं तेच तू कर, असे मला ते सांगतात.

 * तू मुंबईची मुलगी आहेस. दहा वर्षांपासून गाणं गात आहेस. १३ व्या वर्षापासूनच तू गाणं गायला सुरूवात केलीस. कसं वाटतंय मागे वळून बघताना?- मी ५ वर्षांची असताना वर्षा भावे या माझ्या गुरूंकडे गाणं शिकायला गेले. तेव्हा मला काहीही यायचं नाही. पण, त्यांनी मला स्टेजवर गाणं कसं परफॉर्म करायचं, हे शिकवलं. हसतखेळत गाणं कसं बसवायचं, हे शिकवलं. त्यानंतर मी रिअ‍ॅलिटी शोजमध्ये आॅडिशन्स दिले. खरंतर हे रिअ‍ॅलिटी शोज क्रॅश कोर्स सारखे असतात. खूप कमी वेळात आपल्याला बरंच काही शिकून घ्यावं लागतं. त्या शिकलेल्या गोष्टींचा तुम्ही तुमच्या भावी आयुष्यात कसा वापर करणार हे तुमच्यावर असते.

 * २०१० मध्ये तू तुझा पहिला सोलो अल्बम लाँच केला होतास. निर्णय किती आव्हानात्मक होता? आणि कसा होता अनुभव?- झी सारेगमप लिटील चॅम्प्सचे सीझन नुकतेच संपले असताना मी तो अल्बम लाँच करायचे ठरवले. कमलेश भडकमकर यांनी ही गाणी बसवली. स्टुडिओत गाणी कशी बसवायची? हे मी शिकले. लाईव्ह आणि स्टुडिओतील गाण्यांमधील फरक मला तेव्हा कळाला. यात मला अवधूत वाडकर आणि मंदार वाडकर यांनी खूप मदत केली. शिवाय शिवकु मार शर्मा, श्रीनिवास खळे, सुरेश वाडकर यांचेही सहकार्य आणि पाठिंबा मला मिळाला. 

 * २०१५ मध्ये तू गुजराती चित्रपटाच्या ‘अचको  मचको’ गाण्यातून प्लेबॅक सिंगिंग म्हणून डेब्यू केला आहे. काय सांगशील? - मला गुजराती बोलता येत असली तरीही मी गुजरातीमधून गाणं कधीही गायलं नव्हतं. ‘हुतूतू’ चित्रपटातील हे गाणं आहे. एका लग्नाचं हे गाणं असून निर्मात्यांनी हे गाणं खास माझ्यासाठी रेकॉर्ड करण्याचे ठरवले होते. हा एक वेगळा अनुभव होता.

* तू एसएनडीटी कॉलेजमधून मास्टर्स इन म्युजिक करत आहेस. आणि शाम सेशन्सबद्दल काय सांगशील?- माझं आता संगीतात मास्टर्स झालं आहे. क्लासिकल शिकत असताना त्याचा वापर गायनात कसा करायचा यावर मी बराच अभ्यास केला होता. त्याशिवाय मी यूट्यूबवर एक प्रोजेक्ट लाँच केला होता. त्यात ४ गाणी ठुमरीआधारित अशी होती. ‘आज जाने की जिद ना करो’,‘केसरिया बानो’ यासारखी गाणी हार्मनीसह रेकॉर्ड केली होती. त्याअगोदर फेसबुकवर मी संगीत क्षेत्रातील माझ्या मित्रांसोबत मिळून एक ‘शाम सेशन्स’ नावाचा ग्रुप बनवला. ज्यात माझे संगीतक्षेत्रातले सगळे मित्र-मैत्रिणी होते. हार्मनीचा वापर करून दोन आवाजात ही गाणी रेकॉर्ड केली गेली.

* हर्षा भोगलेंची तू भाची आहेस. सोशल मीडियावर तुझे व्हिडीओज ते पोस्ट करत असतात. काय वाटते?- खूप छान वाटतं. कारण हर्षा मामा बद्दल काय बोलणार? ते माझ्यासोबतच सगळयांचेच मामा बनले आहेत. त्यांचा मला कायमच पाठिंबा असतो. ते मला खूपच समजून घेतात. घरच्यांचा असा सपोर्ट मिळाला की खूप छान वाटतं.

* शंकर महादेवनसोबत गाणे गायले आहेस. काय सांगशील कसा होता अनुभव?- शंकर महादेवन यांच्यासोबत गायनाचा अनुभव खूपच चांगला होता. त्यांच्यामध्ये खूप एनर्जी आहे. बरंच काही शिकायलाही मिळालं आहे. त्याशिवाय विशाल ददलानी हे देखील स्टेज शोज करत असतात. खरंतर या मोठया गायकांसोबत गायला मिळणं हीच माझ्यासाठी पर्वणी आहे. कारण मला यातून शिकायलाच मिळणार आहे.

* गाणं तुझ्यासाठी काय आहे?- गाणं माझं सर्वस्व आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत माझ्या डोक्यात कुठलं ना कुठलं गाणं हे सुरूच असतं. कोणत्याही कलाकारासाठी गाणं, संगीत हे त्यांचं आयुष्य असतं.

टॅग्स :इंडियन आयडॉलटेलिव्हिजन