सोनी सब वाहिनीवर शिवानी व सिद्धी या दोन बहिणींमधील अतूट प्रेमाची कथा सांगणारी मालिका 'सुपर सिस्टर्स' नुकतीच दाखल झाली आहे. यात शिवानीची भूमिका वैशाली टक्करने आणि सिद्धीची भूमिका मुस्कान बामणे यांनी साकारली आहे.
उत्साही, नेहमी आनंदी असणारी आणि जीवनाचा पुरेपुर आनंद घेणारी, तसेच टॉमबॉयसारखे व्यक्तिमत्व असलेल्या सिद्धीची भूमिका साकारणाऱ्या मुस्कानची हरियाणवी भाषाशैली अगदी सुरीच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण आहे. अभिनेत्रीने या भाषा शैलीवर प्रभुत्व निर्माण केले आहे. तिने मालिकेमधील आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी प्रोफेशनलकडून हरियाणवी भाषेचे धडे घेतले आहेत. तिची गुरू सुनिता शर्माने बॉलिवुड सुपरस्टार आमीर खानला देखील 'दंगल' या ब्लॉकबास्टर चित्रपटामधील हरियाणवी भाषेसाठी प्रशिक्षण दिले आहे.याबाबत मुस्कान बामणे म्हणाली,' मी 'सुपर सिस्टर्स' मालिकेत करत असलेली भूमिका सिद्धी ही कधीच शाळेत गेलेली नाही. यामुळेच तुम्हाला मालिकेमध्ये ती अस्सल हरियाणवी भाषेमध्ये बोलताना दिसणार आहे. ही भाषाशैली अवगत करण्यासाठी मला या भाषा व भाषाशैलीचे सखोल प्रशिक्षण घ्यावे लागले. मला ही भाषाशैली शिकवण्यासाठी खूप वेळ लागला. पण मला महान गुरूंकडून शिकायला मिळत होते. आमीर खानला प्रशिक्षण दिलेल्या सुनिता मॅडम मला हरियाणवी शिकवण्यासाठी इथे आल्या आहेत आणि मला शिकताना खूप मजा देखील येत आहे.' वैशाली ठक्कर व मुस्कान बामणे यांच्यासोबत मालिकेमध्ये गौरव वाधवा, विजय बदलानी, कुणाल पंडित, मानिनी दि मिश्रा आणि ईशा आनंद शर्मा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. सध्या सुरू असलेल्या एपिसोड्समध्ये शिवानी तिच्या शाळेला छप्पर बसवण्यासाठी ओबेरॉय एन्टरप्राईजेजच्या अश्मित ऑबेरॉय यांच्याकडे देणगी मागायला जाणार आहे. काल्पनिक गोष्ट व अतूट प्रेमासह प्रेक्षकांना आगामी एपिसोड्समध्ये एक सरप्राईज पाहायला मिळणार आहे.