Join us

"मोराच्या आवाजांनी माझ्या दिवसाची सुरूवात होते", दिशा परदेशीने सांगितला शूटिंगचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 12:44 PM

नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली 'लाखात एक आमचा दादा' ही मालिका वाई मध्ये शूट होतं आहे. या मालिकेची नायिका दिशा परदेशी(Disha Pardeshi)ने शूटिंगचा अनुभव व्यक्त केला.

सध्या सातारा वाई भागात अनेक मालिकांची शूटिंग सुरु आहेत. 'अप्पी आमची कलेक्टर', 'पारू' सारख्या मालिका सातारामध्ये शूट होत आहेत. तसेच नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली 'लाखात एक आमचा दादा' (Lakhat Ek Amcha Dada) ही मालिका वाईमध्ये शूट होतं आहे. या मालिकेची नायिका दिशा परदेशी(Disha Pardeshi)ने शूटिंगचा अनुभव व्यक्त केला. 

दिशा परदेशी म्हणाला की, "आम्ही सातारा, वाई भागात शूट करतोय. वाईच्या आधी एक छोटंसं  गाव पडत मयुरेश्वर तिथे आमचा सेट आहे, आमचा वाडा आहे आणि आम्ही कलाकार ही इथेच आसपास राहत आहोत. इथे शूट करण्याची खासियत म्हणजे हे ठिकाण खूप निसर्गरम्य आहे जिथं पर्यंत नजर जाईल तिथंपर्यंत हिरवळच दिसतेय. त्यामुळे माझा पूर्ण दिवस एकदम सुखकारक जातो. इथे शहरासारखी रहदारी नाही, गाड्या कमी असल्यामुळे हँकिंगच प्रमाण कमी आहे. याचमुळे मी तुळजाच पात्र खऱ्याअर्थाने जगत आहे. सातारामध्ये ही प्रचंड पाऊस पडतो फरक इतकाच की इथे मुंबई सारखं पाणी तुंबत नाही त्यामुळे शूटिंगमध्ये बाधा येत नाही आणि इथे पाऊसाची मनसोक्त मज्जा घेता येते. 

शहरात ही गोष्ट कधीच अनुभवायला मिळाली नाही...

पुढे ती म्हणाली की, मुंबईमध्ये अवतीभवती मोठंमोठ्या इमारती दिसतात पण इथे हिरवगार निसर्ग अनुभवायला मिळतो आणि पावसात इकडच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते. माझा जन्म एका छोट्या शहरातला आहे तिथेच माझं शालेय शिक्षण झाले आणि  कॉलेज मुंबई मधलं  रुईया कॉलेज. कामासाठी मी जगभर  फिरते पण कधी गावात शूटिंग करायचा अनुभव नव्हता मिळाला. पण 'लाखात एक आमचा दादा' मालिकेमुळे मला ही संधी मिळाली.  मी खरंच सांगेन फार  टेन्शन आलं होत मला ? पण इथे आल्यावर माझं आयुष्य सॉर्ट आऊट झाले आहे. कितीदा असे झाले आहे की आऊटडोर शूटिंग लागलाय  आणि तिथे फोनचे नेटवर्क नाही हेच जर मी मुंबईत असताना झालं असत तर मी पॅनिक झाले असते. काम आणि मन दोन्ही प्रसन्नतेत सुरु आहे. शहरात ही गोष्ट कधीच अनुभवायला मिळाली नाही. 

माझ्या दिवसाची सुरूवात मोराच्या आवाजाने होते

इथेच एका घरात आम्ही जेवतो त्या मावशींची शेती आहे आणि त्या दररोज ताज्या भाज्या काढून आमच्यासाठी  जेवण बनवतात. इतकं स्वादिष्ट जेवण मी आज पर्यंत कधीच खाल्ले नाही. एकदम ऑरगॅनिक आणि घरगुती जेवण मी शूटिंगवर खात आहे. अजून एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे जितके मोर मी माझ्या पूर्ण आयुष्यात नसतील पाहिले तितके मी इथे ह्या गावात पहिले आहेत. चक्क रास्ता क्रॉस करत असताना इथे मोर दिसतात. माझ्या दिवसाची सुरूवात मोराच्या आवाजाने होते. मला इथे गजर लावायची गरज लागत नाही. गावात शूटिंग करण्याच्या अनुभव बद्दल मी जितकं बोलीन तितकं कमीच आहे. त्यांनी मला ही सुंदर संधी आणि अनुभव दिल्याबद्दल झी मराठी आणि वज्रची मी आयुष्यभर ऋणी राहीन, असे तिने म्हटले.