Join us

"जगावेगळा बाप साकारताना रोज डोळे पाणावतात..."; किरण मानेंची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 7:56 PM

Kiran Mane : किरण माने यांनी सोशल मीडियावर मालिकेतला फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

मराठी छोट्या पडद्यावर विविध भूमिका साकारुन अभिनेता किरण माने यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. बिग बॉस मराठी या रिएलिटी शोमधून ते घराघरात पोहचले. सध्या ते कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची या मालिकेत पाहायला मिळत आहे. दरम्यान आता किरण माने यांनी सोशल मीडियावर मालिकेतला फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

किरण माने यांनी सिंधुताई माझी माई मालिकेतील एक फोटो शेअर करत लिहिले की, पं. सत्यदेव दूबेजी एकदा म्हणाले होते, "अभिनयातला एक भाव असा आहे, जो पुरूष कलावंतांना व्यक्त करणं फार अवघड असतं... स्त्री कलावंतांसाठी ते अगदीच सोपं असतं... तो म्हणजे 'वात्सल्य' भाव ! पोटच्या लेकराविषयीचं ममत्व." ते बोलल्याक्षणी मी ते डायरीत लिहीलं होतं. हिंदी सिनेमात पुरूष कलावंतांनी उत्कटपणे आणि उत्कृष्टपणे दाखवलेल्या वात्सल्यभावाची दोन उदाहरणंही दूबेजींनी दिली होती. एक 'नाजायज़' सिनेमातल्या "अभि जिंदा हूॅं तो जिने लेने दो" या गाण्यातलं... नसिरूद्दीन शाह आपल्या मुलाला, अजय देवगणला पहाण्यासाठी रस्त्यावरच्या भिकार्‍यांसोबत गाणे गात-गात त्याच्या घरासमोर जातो... आणि डोक्यावर घोंगडे पांघरुन त्याला लपून पहातो तो क्षण... आणि दुसरा प्रसंग 'पापा कहते है' सिनेमात टिकू तलसानियानं मुलीच्या बिदाईच्या वेळी साकारलेला ! असा पुरूष कलावंतांना दुर्लभ असलेला 'वात्सल्यभाव' भरभरून दाखवायची संधी मला 'सिंधुताई... माझी माई' मालिकेनं दिलीय.

किरण माने पुढे म्हणाले की, अभिमान साठे हा जगावेगळ्या पोरीचा जगावेगळा बाप साकारताना रोज मन भरून येतं... रोज डोळे पाणावतात... मुलीतलं टॅलेन्ट ओळखून तिला शिकायला मिळावं, तिनं मोठं व्हावं म्हणून, सगळ्या संकटांशी विलक्षण ताकदीनं लढलाय हा माणूस ! जन्मापासून स्वत:च्या आईसकट संपूर्ण घरानं नाकारलेल्या चिंधीवर मायेचा अमाप वर्षाव करणारा 'बाप'माणूस तिला लाभला म्हणून तर नंतरच्या काळात ती हजारो अनाथांची माय होऊच शकली. ...रंगभुमी आणि टी.व्ही.नं मला कायम अविस्मरणीय भुमिका दिल्या. टीव्हीनं तर घराघरात पोहोचवलं. लोकप्रियता दिली. ते दान घेताना कुठेही कमी पडू नये याची काळजी मी मनापासून घेतोय... तुम्ही, माझ्या चाहत्यांनीही माझ्या सगळ्या कलाकृतींना कायम उच्चांकी टीआरपी दिलाय. ही तर प्रेमाचा, मायेचा, वात्सल्याचा संदेश घेऊन आलेली मालिका आहे. हिच्यावर तुम्ही मनापासून प्रेम कराल याची खात्री आहे. न हारा है 'इश्क़' और न दुनिया थकी है... दिया जल रहा है, हवा चल रही है !

टॅग्स :किरण माने