अभिनय माझं आयुष्य-लुब्ना सलीम
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 7:14 AM
अबोली कुलकर्णीहिंदी मालिका, चित्रपट या प्रकारांमध्ये लीलया आपला वेगळेपणा सिद्ध करणारी अभिनेत्री म्हणजे लुब्ना सलीम. त्या स्टार प्लस ...
अबोली कुलकर्णीहिंदी मालिका, चित्रपट या प्रकारांमध्ये लीलया आपला वेगळेपणा सिद्ध करणारी अभिनेत्री म्हणजे लुब्ना सलीम. त्या स्टार प्लस वाहिनीवरील ‘मरियम खान-रिपोर्टिंग लाइव्ह’ या मालिकेत रिफत अश्रफ या व्यक्तिरेखेत दिसत आहे. त्यांच्या या भूमिकेविषयी आणि आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयी त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा... * ‘मरियम खान-रिपोर्टिंग लाइव्ह’ या मालिकेत तुम्ही रिफत अश्रफ या व्यक्तिरेखेत दिसत आहात. काय सांगाल तुमच्या व्यक्तिरेखेविषयी?- मला नेहमीच वेगळं काहीतरी करायला आवडतं. मी हटके भूमिकेच्या शोधात असतानाच मला रिफतची भूमिका आॅफर झाली. ती एकदम साधी स्त्री आहे, जी तिच्या कुटुंबासाठी काहीही करू शकते. ती स्वत:साठी काहीही करत नाही. पती वसीम आणि मुलगा फवाद यांच्यावर तिचं जीवापाड प्रेम आहे. त्यामुळे ती स्वत:साठी कुठलाही विचार करत नाही. मला ही भूमिका मनापासून आवडली म्हणून मी ती स्विकारली. मी या भूमिकेमध्ये खूप कम्फर्टेबल आहे.* मालिकेच्या सेटवरील वातावरण कसे असते? टीमसोबत तुमची बाँडिंग कशी आहे?- आम्ही मालिकेच्या सेटवर खूप धम्माल, मस्ती करत असतो. या मालिकेमध्ये चार पिढी दाखवण्यात आल्या आहेत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आमचं खूप छान बाँडिंग तयार झालं आहे. याचं सर्व श्रेय आमच्या निर्मात्यांना जातं. सुरूवातीच्या दिवसांत आम्ही एकमेकांसोबत ओळख नसल्याने एकत्र जेवत नसू. पण, हळूहळू जशी ओळख झाली तसं आम्ही मस्त एकत्र बसून गप्पा-टप्पा करत जेवू लागलो. आता आमच्यातच एक प्रेमाचा दुवा निर्माण झाला आहे. * बा, बहू और बेबी या मालिकेतील तुमच्या भूमिकेविषयी बरीच चर्चा रंगली होती. कसे वाटते आता मागे वळून पाहताना?- बा, बहू और बेबी या मालिकेत मी लीला नावाचं कॅरेक्टर रंगवलं होतं. या मालिकेच्या दरम्यान माझ्या आयुष्यातील सर्वांत सुवर्णकाळ होता. आजही मला कुणी लीला म्हणून माझ्याशी बोललं तर मला खूप आनंद होतो. आज मागे वळून बघताना खूप समाधान वाटतं. मी केलेल्या कामाचं चीज झालं असं वाटतं. इंडस्ट्रीने खूप काही शिकवलं आहे.* ‘ओह माय गॉड’, ‘जस्ट मॅरिड’, ‘जाने क्या होगा आगे’ या चित्रपटांत तुम्ही काम केले आहे. टीव्ही आणि चित्रपटात काम करताना कोणता फरक जाणवतो?- माध्यम कोणते आहे? हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा नाहीच. मला फक्त कॅमेऱ्यासमोर गेल्यावर मी कसं काम करते? याकडे माझे लक्ष लागलेले असते. चित्रपट हे काही ठराविक काळापुरते मर्यादित असतात. मात्र,मालिकांचं तसं नसतं. त्यांना दिवसातील संपूर्ण वेळ शूटिंगसाठी द्यावाच लागतो. पण, दोन्ही माध्यमांमध्ये तितकीच मजा येते.* ‘द आम आदमी फॅमिली’ या वेबसीरिजसाठी तुम्ही काम केले आहे. यानंतरही आॅफर आल्यास काम करायला आवडेल का? - होय, खरं सांगायचं तर वेबसीरिज म्हणजे मस्ती, मजा. खूप मजा येते काम करताना. यानंतरही वेबसीरिजची आॅफर आली तर नक्कीच मला काम करायला आवडेल. ‘द आम आदमी फॅमिली’ या वेबसीरिजवेळी आम्ही सर्वसामान्य कुटुंबाची कहानी दाखवली होती. ती प्रेक्षकांना तुफान आवडली. तसाच प्रयोग आम्ही मालिकेच्या दुसऱ्या सीजनवेळी देखील केला होता. * अभिनय तुमच्यासाठी काय आहे?- अभिनय माझ्यासाठी आयुष्य आहे. मी याशिवाय जगूच शकत नाही. माझं आयुष्य अभिनयामुळे खूप समृद्ध झालं आहे.