Join us

ये मेरी लाइफ है फेम शमा सिंकदरने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2016 12:06 PM

ये मेरी लाइफ है, बालवीर यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेल्या शमा सिकंदरने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. शमाने पाच वर्षांपूर्वी ...

ये मेरी लाइफ है, बालवीर यांसारख्या मालिकांमध्ये झळकलेल्या शमा सिकंदरने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला आहे. शमाने पाच वर्षांपूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता असे तिने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. मानसिक आजारामुळे तिने हे पाऊल उचलले असल्याचे तिने या मुलाखतीत सांगितले आहे. शमा सांगते, "मला लोकांशी बोलायला अजिबातच आवडायचे नाही. मी कोणाला भेटायचीदेखील नाही. सगळ्या फ्रेंड्सनादेखील भेटणे मी सोडून दिले होते. माझ्या मनात माझ्याविषयीच तिरस्कार निर्माण झाला होता. माझ्या करियरमध्ये आणि प्रेमप्रकरणातही अनेक चढउतार आले होते. या सगळ्यामुळे खूपच तणाव वाढला होता. मला जेवणाचीदेखील इच्छा होत नसे. माझे हे सगळे वागणे पाहून मला मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे माझा पूर्वप्रियकर अॅलेक्स ओनीलच्या लक्षात आले. पण त्यावेळी मी डॉक्टरांकडेदेखील जायला तयार नव्हते. माझ्यात जगण्याची इच्छाच उरली नव्हती. कोणत्याच गोष्टीमुळे मी आनंदित, उत्साहित होत नव्हती. एका रात्री मी माझ्या आईच्या कपाळाचे चुंबन घेतले आणि मला सकाळी उठवू नकोस असे तिला सांगितले. मी माझ्या खोलीत जाऊन खूप साऱ्या झोपेच्या गोळ्या खालल्या. पण मी गोळ्या खाण्यापूर्वी माझ्या भावाला माझ्या बँकेच्या अकाऊंटचे डिटेल्स मेसेज केले होते. यामुळे त्याला थोडासा संशय आला आणि त्याने लगेचच माझ्या आईला फोन करून मी काय करत आहे हे पाहाण्यासाठी सांगितले. आई माझ्या खोलीत आल्यावर माझी अवस्था पाहून ती खूपच घाबरली. मला लगेचच डॉक्टरकडे नेण्यात आले. मी गोळ्या घेऊन केवळ तीनच तास झाले असल्याने माझे प्राण वाचले. पण त्यावेळी मला का वाचवण्यात आले, यासाठी मी माझ्या कुटुंबीयांवर खूप चिडले होते. पण नंतर मेडिटेशनच्या मदतीने मी या सगळ्यातून बाहेर पडले. आज मी छोट्याशा गोष्टीतदेखील आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतेय. तसेच स्वतःहून लोकांसोबत मैत्री करते." शमा सिकंदरने मन, धुम धडाका यांसारख्या हिंदी चित्रपटातही काम केले आहे.