Join us

‘छोट्या पडद्यासह माझ्या नव्या जर्नीला सुरूवात’-मिनिषा लांबा

By अबोली कुलकर्णी | Published: August 23, 2018 5:28 PM

‘यहाँ’ चित्रपटातून अभिनेत्री मिनिषा लांबा हिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ‘बचना ऐ हसीनो’ मधील तिच्या भूमिकेनंतर ती चांगलीच चर्चेत आली. तिच्या क्यूट अंदाजाने कायमच प्रेक्षकांना घायाळ केले.

‘बचना ऐ हसीनो’,‘भेजा फ्राय २’ या हिंदी चित्रपटांत अभिनेत्री मिनिषा लांबा हिने उत्कृष्ट भूमिका साकारल्या. ‘यहाँ’ चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. ‘बचना ऐ हसीनो’ मधील तिच्या भूमिकेनंतर ती चांगलीच चर्चेत आली. तिच्या क्यूट अंदाजाने कायमच प्रेक्षकांना घायाळ केले. आता ती कलर्स वाहिनीच्या ‘इंटरनेटवाला लव्ह’ या मालिकेत माहिरा या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. छोटया पडद्यावरच्या या  नव्या जर्नीबद्दल तिच्याशी मारलेल्या या गप्पा...

 * कलर्स टीव्हीवर २७ आॅगस्ट पासून ‘इंटरनेट वाला लव्ह’ शो सुरू होणार आहे. काय सांगशील तुझ्या कॅरेक्टरविषयी?  - ‘इंटरनेट वाला लव्ह’ ही कथा नवी दिल्लीत घडत आहे, जेथे प्रमुख पात्र असलेला जय रेडियो स्टेशनवर एक लोकप्रिय आरजे आहे आणि तो इंटरनेटवर नोंद होण्याची गरज असलेल्या वाढत्या जमातीचा एक सदस्य आहे. त्याच्या मते आॅनलाइन शॉपिंग, बँकिंग असो किंवा प्रेम असो सर्व काही व प्रत्येक गोष्ट सोशल मिडियावर होऊ शकते तर दुसरीकडे आद्या, एक शिस्तप्रिय मुलगी आहे तिचा आॅनलाइन डेटिंगच्या संकल्पनेवर अजिबात विश्वास नाही. ती एका वेडिंग प्लॅनिंग एजन्सीमध्ये काम करते आणि ती चालवत आहे माहिरा (मिनिशा लांबा) जी एक परिपूर्णतवादी असून तिला सर्व गोष्टी तिच्या कलाने झालेल्या हव्या असतात. तिने स्वत:च्या हिंमतीवर एवढी मोठी कंपनी उभी केलेली असते. त्यामुळे ती मेहनत आणि कष्टावर जास्त विश्वास ठेवत असते.

* बिग बॉस, कॉमेडी नाईटस बचाओ आणि तेनाली रामा या मालिकांनंतर ‘इंटरनेटवाला लव्ह’ या मालिकेत तू दिसणार आहेस. तुझ्याकडे जेव्हा शोची आॅफर आली तेव्हा तुझी रिअ‍ॅक्शन काय होती?  - माझ्याकडे जेव्हा मालिकेचा प्रस्ताव आला तेव्हा मला खूप आनंद झाला. कारण या शोचे कथानक मला सगळयांत जास्त आवडले. या शोचा विषय असा आहे की, सर्व युवापिढीला तो आवडेल. खरंतर हा विषय असा आहे की, प्रत्येक वयाच्या व्यक्तींना तो नक्कीच आवडेल, मला खात्री आहे. 

* २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डबल की ट्रबल’ या पंजाबी चित्रपटानंतर तू आम्हाला दिसली नाहीस. आता तू चित्रपटात केव्हा दिसणार?  - सध्या तरी मी या टीव्ही शो मध्ये दिसतेय. माझ्याकडे सध्या कुठल्याही चित्रपटाचा प्रस्ताव आलेला नाहीये. पण, मला असं वाटतं की, टीव्ही हे माध्यम खूप लोकांपर्यंत पोहोचते. चित्रपटांपेक्षाही टीव्हीवरील कलाकारांवरच प्रेक्षक जास्त प्रेम करतात. 

* ‘यहाँ’ या चित्रपटातून तू इंडस्ट्रीत डेब्यू केला होतास. यानंतर तू ‘बचना ऐ हसीनो’, ‘भेजा फ्राय २’ अशा अनेक चित्रपटात तू काम केले आहेस. काय वाटतं काय मिळवलंय आत्तापर्यंत?- होय, खूप चांगलं वाटतंय. कारण आत्तापर्यंत अनेक चांगले दिग्दर्शक, निर्माता मंडळी यांच्यासोबत मी काम केलं आहे. अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. अनेकदा असं होतं की, आपण व्यक्तींपेक्षा शूटिंगमधून, सेटवर अनेक गोष्टी शिकतो. आता माझी टीव्हीमध्ये नवीन जर्नी सुरू झाली आहे. काम करताना मजा येतेय. टीव्हीवरचा अनुभव अजून यायचा आहे.

* मोठा पडदा आणि छोटा पडदा या दोन्ही पातळयांमध्ये तू काम केलं आहेस. दोन्ही प्रकारांत काय फरक जाणवतो?  - मी दोन्ही प्रकारांत काम केलं आहे. पण, छोटया पडद्यासाठी तुम्हाला सातत्याने शूटिंग हे करावंच लागतं. तसं चित्रपटाच्या बाबतीत होत नाही. तुम्ही ३ ते ४ महिन्यांत एका चित्रपटाचा प्रोजेक्ट पूर्ण करू शकतो. त्यामुळे दोन्हीकडे काम करण्याचा अनुभव हा कलाकारांकडे असलाच पाहिजे. 

* स्क्रिप्ट निवड करताना कोणत्या गोष्टींची तू काळजी घेतेस?  - कथा मनोरंजक असली पाहिजे. कारण, जर कथेत काही वेगळेपण असेल तरच प्रेक्षक  तिच्याकडे आकर्षित होतात. त्याचबरोबर त्या कथेची उत्तमरित्या मांडणी झाली पाहिजे. दिग्दर्शकही तसेच हवेत. उत्तम दिग्दर्शक लाभणं हा देखील एक सुदैवी योगच म्हणावा लागेल.

* सोशल मीडियावर तू खूप अ‍ॅक्टिव्ह आहेस. सध्या ट्रोलिंगचे प्रमाण वाढले आहे. त्याबद्दल तुझं मत काय? - होय. पण, सध्या ट्रोलिंगचा जो विषय आहे तो व्यक्तीपरत्वे बदलतो. मात्र, तरीही नेटिझन्सनी देखील पोस्ट करताना थोडा विचार करणं अपेक्षित आहे. सोशल मीडियावर वाईट कमेंटस टाकणे सभ्यपणाचे लक्षण नाही. त्यासोबतच सेलिब्रिटींनी देखील थोडं भान ठेवलं पाहिजे. 

* अभिनय तुझ्यासाठी काय आहे?- अभिनय माझ्यासाठी माझं आयुष्य आहे. मी त्याशिवाय माझ्या आयुष्याचा विचारच करू शकत नाही. 

* मराठी प्रोजेक्टसची आॅफर तुला मिळाली तर करायला आवडेल का?- होय, नक्कीच. सध्या मराठी चित्रपटांना प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळताना दिसत आहे. मराठी चित्रपटात काम करणं हा माझ्यासाठी एक चांगला अनुभव असेल. 

टॅग्स :इंटरनेटवाला लव्हटेलिव्हिजन