कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि उत्तम प्रतिसादाने 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी पल्ला गाठला. आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला.
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने मराठी इंडस्ट्रीलीच नव्हे तर बॉलिवूडला देखील भुरळ घातली आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांचा प्रचंड लाडका आहे. या कार्यक्रमातील निलेश साबळे, भाऊ कदम, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे आणि कुशल बद्रिके हे कलाकार प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. केवळ मराठीच नव्हे तर अमराठी लोक देखील या कार्यक्रमाचे फॅन आहेत. झी मराठीच्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या मंचावर आजवर अनेक सेलिब्रिटी आले आहेत. सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, श्रीदेवी, अनुष्का शर्मा, काजोल, अजय देवगण, अक्षय कुमार, गोविंदा, अनुष्का शर्मा, कंगना रणौत यांसारख्या बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी आजवर या कार्यक्रमात हजेरी लावली आहे. तसेच भारतीय क्रिकेट महिला संघाच्या खेळाडूंनी देखील या कार्यक्रमात येऊन धमाल मस्ती केली होती. आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी केवळ मराठी सेलिब्रेटी नव्हे तर बॉलिवूडमधील सेलिब्रेटी देखील याच कार्यक्रमाला पसंती देतात.
२०१८ हे वर्ष आता संपून नवीन वर्षाचे वेध सगळ्यांना लागले आहेत. २०१८ हे वर्ष मराठी सिनेसृष्टीसाठी देखील कमालीचं होतं, कारण २०१८ मध्ये अनेक दर्जेदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. त्यातील काही चित्रपटांचे कलाकार थुकरटवाडीत सज्ज होणार आहेत. नाळ चित्रपटातील श्रीनिवास पोकळे आणि देविका दफ्तारदार, येरे येरे पैसा चित्रपटातील तेजस्विनी पंडित, मुळशी पॅटर्न चित्रपटातील ओम भुतकर आणि बबन चित्रपटातील कलाकार यांनी चला हवा येऊ द्या च्या मंचावर हजेरी लावली. आता हे सर्व कलाकार थुकरट वाडीत आल्यावर विनोदवीरांनी देखील एकच कल्ला केला. २०१८ मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट कुठला यावर या विनोदवीरांनी एक धमाल विनोदी स्किट सादर केलं आणि सगळ्यांना पोट धरून हसायला भाग पाडलं.
ही धमाल प्रेक्षकांना सोमवार मंगळवार रात्री ९.३० वाजता फक्त झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.