Join us

'इंडियन आयडॉल १२'च्या मंचावरून नचिकेत लेले संरक्षण दलांना देणार सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 6:28 PM

इंडियन आयडॉलचा १२ वा सीझन अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. १५ ऑगस्टला या शोचा अंतिम सोहळा रंगणार आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉलचा १२ वा सीझन अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. अंतिम फेरीतील स्पर्धक इंडियन आयडॉल 12 चे विजेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. इंडियन आयडॉलच्या या सत्रात देशभरातून अनेक प्रतिभावान कलाकारांनी सहभाग घेतला. त्यापैकी एक गुणी गायक होता, नचिकेत लेले. या शो मध्ये त्याने एकापेक्षा एक असे अनेक उत्तमोत्तम परफॉर्मन्स दिले आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. या शोच्या फिनालेच्या निमित्ताने पुन्हा एकदा हे सगळे माजी स्पर्धक या मंचावर येत आहेत. 

नचिकेत लेले अत्यंत आकर्षक रूपात या शोमध्ये दिसणार आहे. फौजी स्पेशल’ भागात तो गांधीजींच्या वेषात दिसणार आहे आणि ‘रघुपती राघव राजाराम’ म्हणणार आहे.

याबद्दल बोलताना नचिकेत लेले म्हणाला, “आगामी भागात मी गांधीजींच्या वेषात दिसणार आहे. आपल्या संरक्षण दलांच्या आग्रहावरून मी छान छान देशभक्ती गीते सादर करणार आहे. आपले सैन्य म्हणजे आपल्या देशाची शान आहे. त्यामुळे आपल्या शोच्या सेट्सवर त्यांच्याबद्दलचा आपला आदर व्यक्त करण्यासाठी मी मनापासून प्रयत्न केला आहे. या महान गीताला मी न्याय देऊ शकलो आहे, असे मला वाटते. आपल्या सेनेसाठी परफॉर्म करण्याचा मान मला दिल्याबद्दल मी इंडियन आयडॉलचा आभारी आहे. तो एक सुंदर क्षण होता, जो सदैव माझ्या स्मरणात राहील.”

१५ ऑगस्ट रोजी इंडियन आयडॉल १२ चा अति भव्य फिनाले प्रसारित होणार आहे. हा प्रदीर्घ फिनाले तब्बल १२ तास चालणार आहे.

टॅग्स :इंडियन आयडॉल