चिमुकल्या रुद्राजने व्हिडिओद्वारे आपल्या आईला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, अन् नम्रता आवटे-संभेरावमधील आई भारावली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 01:40 PM2019-08-29T13:40:33+5:302019-08-29T13:43:22+5:30
अवघ्या ५ महिन्यांच्या बाळाचा आणि आईचा म्हणजेच नम्रताचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मायलेकाचं नातं काही वेगळंच असतं. आपल्या पोटच्या गोळ्यावर आईचं जीवापाड प्रेम असतं. आपल्या लेकरापासून ही माऊली जरा वेळही दूर राहू शकत नाही. मात्र काही आई इच्छा असूनही लेकरासोबत कायम राहू शकत नाही. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या आईला सदैव आपल्या बाळाजवळ राहणं शक्य नसतं. कामासाठी मनाला आवर घालत ती घराबाहेर पडते. अशाच मातांपैकी एक म्हणजे अभिनेत्री आणि कॉमेडीयन नम्रता आवटे-संभेराव. काही महिन्यांपूर्वी नम्रता आणि तिचा पती योगेशच्या जीवनात गोंडस पाहुण्याचं आगमन झालं. या बाळाचं रुद्राज असं नाव या दाम्पत्याने ठेवलं. या अवघ्या ५ महिन्यांच्या बाळाचा आणि आईचा म्हणजेच नम्रताचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत नम्रता शुटिंगच्या सेटवर असल्याचे पाहायला मिळत आहे.
नम्रताच्या हातात मोबाईल असून त्यात तिच्या बाळाचा म्हणजेच रुद्राजचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओद्वारे रुद्राजने आपल्या आईला खास दिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. नम्रताचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र यांत सगळ्यात स्पेशल शुभेच्छा ठरल्या त्या रुद्राजच्या. रुद्राज आपल्या गोड हास्याने लाडक्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे.
खुद्द नम्रताने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. “मी खूप आनंदी आणि भाग्यवान आई आहे. हो रुद्राज त्याच्या स्मित आणि गोड हास्याद्वारे मला म्हणतोय हॅप्पी बर्थडे आई” अशा शब्दांत नम्रताने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या अंतिम फेरीत धडक मारत नम्रताने स्वतःमधील अभिनय कौशल्य सिद्ध केले. 'फु बाई फु', 'कॉमेडीची बुलेट ट्रेन' या विनोदी कार्यक्रमांमधून प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर 'पुढचं पाऊल', 'लज्जा', या गोजिरवाण्या घरात', 'एक मोहोर अबोल' या मालिकांमधून तिने गंभीर धाटणीच्या भूमिकादेखील निभावल्या. 'बाबू बँड बाजा' या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले. विशेष म्हणजे प्रियंका चोप्राची निर्मिती असलेल्या 'व्हेंटिलेटर' या चित्रपटात तिने साकारलेली भूमिकासुद्धा खूप गाजली. नम्रताने छोट्या आणि मोठ्या पडद्यासोबतच रंगभूमीवरही स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. 'पहिलं पहिलं' हे विनोदी नाटकसुद्धा बरंच गाजलं.