छोट्या पडद्यावरून प्रसारित झालेला महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय झाला. या कार्यक्रमातील सर्व कलाकारांवर प्रेक्षकही भरभरून प्रेम करतात. त्यातील एक अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. अभिनयाबरोबरच नम्रता सोशल मीडियावर देखील खूपच सक्रीय असते. सोशल मीडियावरून ती चाहत्यांशी संवाद साधत असते. सोशल मीडियावर ती कामासंदर्भात चाहत्यांना माहिती देत असते. आता नम्रतानं घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीसंदर्भात एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे.
नम्रतानं पोस्टमध्ये लिहलं, "काय करायचं घोडबंदर रोडचं , लोडेड ट्रक टेम्पो पलटी होतायत. साधारण रोजचा प्रवास असल्याने मी सांगू शकते, किमान 95 टक्के प्रमाण आहे. बरं नेमका प्रकार काय घडलाय त्याचा ही थांगपत्ता लागत नाही. कारण कधीकधी विनाकारण ट्रॅफिक लागतं. त्यामुळे हातावर हात धरून बसणे एवढाच पर्याय. सुखसोयी असलेले मोठमोठाले टॉवर झालेत खरं, पण सुखाचा प्रवास कसा होईल, ह्याची पण काळजी घ्यायला हवी. मेट्रोचं काम चालू आहे पण ती सुद्धा गायमुख पर्यंत जिथून खरं पुढे ट्रॅफिकला सुरुवात होते. अर्ध्या तासाच्या रस्त्याला 2 ते 3 तास लागतात. काय होऊ शकतं यावर". तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. . एका नेटकऱ्यानं कमेंट केली, आपण फक्त मनातल्या मनात संताप करू शकतो. अजून काय?.