'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातील 'लॉली' म्हणजेच नम्रता संभेराव (Namrata Sambherao) अमेरिकेला निघाली आहे. 'कुर्रर्रर्र' या नाटकातील कलाकार आता अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. महिनाभर अमेरिकेतच नाटकाचे प्रयोग होणार आहेत. त्यामुळे कलाकार म्हणून नम्रता खूपच उत्सुक आहे मात्र आई म्हणून तिच्या मनाची प्रचंड घालमेल होत आहे. लेकापासून महिनाभर दूर राहावं लागणार असल्याने नम्रता भावूक झाली आहे.
नम्रता संभेरावला 'रुद्राज' हा चार वर्षांचा मुलगा आहे. नेहमी लेकाला सोडून शूटला जातानाच नम्रताच्या मनाची काय घालमेल होते हे तिने अनेकदा व्यक्त केलंय. आता तर तिला थेट महिनाभर अमेरिकेला जायचं असल्याने आई म्हणून ती खूपच भावूक झाली आहे. महिनाभर लेकापासून दूर राहायचं तरी नाटकाचा दौरा यशस्वीरित्या पूर्ण करावाच लागणार आहे.
नम्रताने भावूक पोस्ट शेअर करत लिहिले,'निघालो साता समुद्रापलीकडे फॅमिली पासून दूर महिनाभर लेकरापासून लांब चाललेय जड पावलांनी निरोप घेताना ऊर भरून आला होता. पण हरकत नाही नाटकाचा अमेरिका दौरा यशस्वीरीत्या पार करून येऊच लवकर तूर्तास bye bye'
'कुर्रर्रर्र' नाटकात हास्यजत्रेतील कलाकार प्रसाद खांडेकरही आहे. याशिवाय विशाखा सुभेदार यांच्याही मुख्य भूमिका आहेत. सर्वांचा एकत्रित मुंबई विमानतळावरचा फोटो व्हायरल झालाय. या दौऱ्यासाठी चाहत्यांनी कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.