Join us  

'नंदिनी अंजली’ बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या 'संगीत सम्राट’

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2017 6:42 AM

'संगीत सम्राट' या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. महाराष्ट्राच्या पहिल्या संगीत सम्राट बनण्याचा मान, अहमदनगरमधील 'नंदिनी अंगद गायकवाड आणि ...

'संगीत सम्राट' या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडला. महाराष्ट्राच्या पहिल्या संगीत सम्राट बनण्याचा मान, अहमदनगरमधील 'नंदिनी अंगद गायकवाड आणि अंजली अंगद गायकवाड' या दोन सख्ख्या बहिणींना मिळाला. या दोन्ही बहिणींनी सुरुवातीपासून उत्तोमोत्तम सादरीकरण करत दोन्ही परीक्षक आदर्श शिंदे आणि क्रांती रेडकर यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. त्यांच्या पहिल्या परफॉर्मन्सपासून आदर्श आणि क्रांती या दोघांनीही या दोघांचेही भरभरून कौतुक केले होते. महा अंतिम सोहळ्यासाठी सुद्धा त्यांनी जय्यत तयारी केली होती. शात्रीय संगीताचा वारसा  लाभलेल्या या बहिणींनी निरनिराळे परफॉर्मन्सच्या सादर करत आपले सांगीतिक क्षेत्रातील टॅलेंट दाखवुन दिले आहे. महाअंतिम सोहळ्यात या दोन्ही बहिणींनी सुधीर फडके यांची गाणी, बहारदार आणि तेवढ्याच निरागस पद्धतीने स्वरबद्ध करत परीक्षकांना आणि प्रेक्षकांना एक वेगळी अनुभूती दिली. महाअंतिम सोहळ्याला  इतर स्पर्धकांनी सुद्धा चांगले प्रदर्शन केले. मात्र परीक्षकांना शेवटी ८ मधून केवळ ३ स्पर्धक निवडायचे होते. आणि त्यातूनही एक संगीत सम्राट निवडायचा होता. सर्वांच्याच अतिशय उत्तम सादरीकरणामुळे परीक्षकांनी बरीच चर्चा करून उत्कृष्ट आणि सर्वोकृष्ट स्पर्धकांची निवड केली. . क्रांती रेडकर यांनी सर्वप्रथम तिसऱ्या क्रमांकाचे नाव जाहीर केले ते होते जेजुरीचा 'प्रथमेश मोरे'. दुसरे नाव म्हणजेच मुंबईच्या 'दंगल गर्ल्स' यांचे नाव आदर्श शिंदे जाहीर केले आणि शेवटी महाराष्ट्राच्या पहिल्या 'संगीत सम्राट' चे नाव 'विशेष परीक्षक' म्हणून उपस्थित असलेले सचिन पिळगावकर’ यांनी जाहीर केले आणि ते होते ‘नंदिनी अंजली’. आदर्श आणि क्रांती हे दोघेही महाराष्ट्राच्या पहिल्या 'संगीत सम्राट' झालेल्या 'नंदिनी अंजली ' चे अभिनंदन करताना म्हणाले “महाराष्ट्राचा पहिला 'संगीत सम्राट' निवडणं हे आमच्यासाठी सुद्धा एक मोठे आव्हान होते. स्पर्धकांचे संगीताच्या सर्व स्तरावर परीक्षण करीत , योग्य स्पर्धक निवडला जाईल असे कटाक्षाने पाहिले. भविष्यकाळात या दोघीही महाराष्ट्रभर संगीताच्या क्षेत्रात नक्कीच नावाजल्या जातील." सचिन पिळगावकर यांनी त्यांची भावना व्यक्त करताना सांगितले, की " या दोन्ही लहान मुली महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारताच्या संगीताचे भविष्य आहेत. 'नंदिनी अंजली' या दोघीनींही असेच पुढे जात प्रेक्षकांना त्यांच्या गायनाने सुखद अनुभव द्यावा, अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे “.'नंदिनी अंजली' यांनी त्यांना मिळालेल्या संधीच सोनं केले आणि संगीत सम्राट या कार्यक्रमामुळे, दोन उत्तम भावी पार्श्वगायिका दिल्या आहेत.  संगीत सम्राट या कार्यक्रमात फायनल पर्यंत पोहचलेला प्रत्येक स्पर्धक मग तो गायक किंवा वादक असो, त्यांच्या गुणवत्तेला दाद देत, स्पर्धेचा निकाल जाहीर होण्याआधीच मराठी कलाक्षेत्रातून कामाच्या विविध संधी उपलबध झाल्या आहेत."